@maharashtracity
१५ कंत्राटदारांना २४ वार्डातील कामांची २५ कोटींचे कंत्राटं
एका कंत्राटदाराला किमान दिड ते सव्वादोन कोटींची कामे
मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) शहर व उपनगरे येथील २४ वार्डातील मालमत्तांमधील विद्युतीकरण, जलकामे करण्यासाठी १५ कंत्राटदारांना २५ कोटी रुपयांचे कंत्राटकाम देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कंत्राटदार (contractor) किमान १९% ते ३३% कमी दरात काम करणार आहेत.
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या २४ वार्डात अनेक मालमत्ता (BMC properties) आहेत. या मालमत्तांमध्ये विद्युतीकरण (electrification), पुनर्विद्युतीकरण, पाण्याचे पंप विद्युत जोडणीसह बदली करणे, नवीन पंप बसविण्याची कामे करावी लागतात. ही कामे खासगी कंत्राटदारांमार्फत करण्यात येतात.
पालिकेने मागील दोन वर्षांसाठी दिलेल्या कंत्राट कामाची मुदत सप्टेंबर २०२१ ला संपुष्टात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या २४ वार्डातील मालमत्तांमधील विद्युतीकरणाची व इतर कामे करण्यासाठी पुन्हा दोन वर्षाचे कंत्राटकाम देणे आवश्यक वाटल्याने पालिकेने त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली.
त्यानुसार २४ वार्डातील या सर्व कामांसाठी ३३ कंत्राटदारांनी टेंडर भरले होते. मात्र काही त्रुटी राहिल्याने त्यापैकी एक कंत्राटदाराला अप्रतिसादात्मक ठरविण्यात आले. मात्र या कंत्राटदारांनी १९% ते ३३% कमी दरात काम करण्याची तयारी दर्शवल्यानंतर त्यापैकी १५ कंत्राटदार हे पात्र ठरले.
या कंत्राटदारांपैकी काहींना वार्डनिहाय दोन, कोणाला तीन, कोणाला चार तर एका कंत्राटदाराला पाण्याबाबतची नऊ अशाप्रकारे कामांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार शहर भागात ८ कंत्राटदारांना किमान १.३७ कोटी ते १.९२ कोटी रुपये प्रमाणे एकूण १४ कोटी ३० लाखांची कंत्राटकामे देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
तर उपनगरे भागातील ७ कंत्राटदारांना किमान १.१० कोटी रुपये ते २.२२कोटी रुपये याप्रमाणे एकूण ११ कोटी ५५ लाख रुपयांची कंत्राटकामे देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे २४ वार्डात तब्बल २५ कोटी ८५ लाख रुपयांची कामे देण्यात येणार आहेत.