समिती आरोग्य सेवा-सुविधा अधिकाधिक सक्षम करणार
पालिकेच्या १९० दवाखान्यात प्रायोगिक स्तरावर ‘टेलि-कन्सल्टेशन’ सुरु करणार
वैद्यकीय उपचारात सुसमन्वयासाठी अत्याधुनिक व प्रभावी सॉफ्टवेअर वापरणार
@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने पालिकेच्या आरोग्य खात्याने पालिका रुग्णालये, दवाखाने येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता मुंबईकरांना अधिकाधिक चांगली आरोग्य सेवा- सुविधा देण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय तज्ज्ञांची ‘आरोग्य सेवा-सुविधांच्या सक्षमीकरणासाठी सल्लागार समिती’ गठीत केली आहे. पालिकेकडून रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचारात सुसमन्वय साधण्यासाठी अत्याधुनिक व प्रभावी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे.
तसेच, पालिकेच्या १९० दवाखान्यात प्रायोगिक स्तरावर ‘टेलि-कन्सल्टेशन’ (Tele consultation) सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना खऱ्या अर्थाने आरोग्य सुविधांबाबत खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
पालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली या सल्लागार समितीची पहिली बैठक मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी सकाळी पार पडली. या समितीद्वारे विविध आरोग्य सुविधांबाबत प्रथम आराखडा हा पुढील दीड महिन्यात महापालिका प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे.
समितीमधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञांचा समावेश
या समितीमध्ये, राज्याचे माजी आरोग्य संचालक डॉ. सुभाष साळुंके, मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे, टाटा समाज विज्ञान संस्थेचे माजी अधिष्ठाता डॉ. टी. सुंदररामन, युनिसेफच्या प्रकल्प संचालिका डॉ. राजेश्वरी चंद्रशेखर, ‘नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर’चे सल्लागार तथा केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील माजी उपायुक्त डॉ. हिमांशू भूषण, राज्याच्या माजी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांचा समावेश आहे.
तसेच सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, के. ई. एम.रूग्णालय अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, नायर रूग्णालय अधिष्ठाता डॉ. प्रविण राठी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे आणि प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये) डॉ. विद्या ठाकूर आदी तज्ज्ञ मंडळींचा सदस्य म्हणून समितीत समावेश असणार आहे.
विविध आजारांच्या प्रतिबंधासाठी करण्यात येणा-या लसीकरणात गुणवत्तापूर्ण वाढ करणे. असंसर्गजन्य रोगांचे निदान व उपचार अधिकाधिक प्रभावी करणे, माता व बाल मृत्यू दर आणखी कमी करण्यासाठी विविधस्तरिय उपाययोजना राबविणे. प्रसुति-पूर्व व प्रसुति-पश्चात घ्यावयाची काळजी, याबाबत विविध स्तरिय कार्यवाहीची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करणे, रुग्णालये, दवाखाने येथे रुग्णांची गर्दी कमी करणे, डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, ‘आशा’ सेविकांचे प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरण करणे, आरोग्य विषयक काही सेवा-सुविधांच्या अंमलबजावणीसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा उपयोग करणे, आरोग्य सेवा-सुविधांच्या सक्षमीकरणासाठी काल-सुसंगत धोरणे तयार करणे, त्यांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा, मार्गदर्शक तत्त्वे, मानदंड आणि मानके तयार करणे हा सदर समिती गठीत करण्यामागील मुख्य उद्देश आहे. तसेच, या समितीची दर दोन महिन्यातून एकदा बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.