खोल समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना परतण्याच्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सुचना
मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपोरजॉय चक्रीवादळ सध्या घोंगावत असून हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह मुंबईवर काय परिणाम करणारे असेल याचा अंदाज बुधवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून वर्तविण्यात आला. त्यानुसार हे चक्रीवादळ मुंबईपासून ९०० किमी अंतरावर खोल अरबी समुद्रातून जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच कोकणासह मुंबईत ९ ते १२ जून दरम्यान हलका ते मध्यमस्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी चक्रीवादळाची स्थिती सांगताना पूर्व मध्य अरबी समुद्रावरील तीव्र चक्री वादळ दिपायजॉय आता अतिशय तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत झाल्याचे सांगितले. यात वाऱ्याचा वेग ११५ ते १२५ प्रतितास प्रति किमी असा असून आगामी २४ तासात हे चक्रीवादळ उत्तरेकडे सकरण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीन दिवस उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा मार्ग मुंबई किनारपट्टीसून कमीत कमी ९०० किमी अंतरावर आहे. दरम्यान, मच्छिमार बांधवांना १२ जून पर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून खोल समुद्रात गेलेल्यांना परतण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सात तसेच आठ जून रोजी कोणत्याही जिल्ह्याता कोणताही इशारा दिला नाही. मात्र ९ ते ११ जून दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे नायर म्हणाल्या.