@maharashtracity
मुंबई: बेस्ट उपक्रमात भाडेतत्त्वावरील बसगाड्यांची व त्यांच्या चालकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बेस्ट परिवहन विभागाचे चालक बिनकामाचे झाले आहेत. त्यामुळे आता गरज भासल्यास सरकारी व खाजगी आस्थापनांसाठी बेस्टच्या चालकांची गरज भासल्यास तेथे त्यांची उपलब्धता करण्यात येणार आहे. (Drives of BEST will work on government or private offices)
त्यामुळे बेस्ट चालकांचा सराव होणार असून त्या माध्यमातून बेस्ट परिवहन विभागाला महसूल मिळण्याचे स्तोत्र निर्माण होईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमाचा तोटा व प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी बेस्टने भाडेतत्त्वावरील १,४२६ बसगाड्या घेतल्या आहेत. मात्र या भाडेतत्त्वावरील बसगाड्यांवर कंत्राटदाराचे बस चालक आहेत. त्यामुळे बेस्ट परिवहन खात्यात भाडेतत्त्वावरील बसगाड्या व चालक यांची संख्या वाढत असताना बेस्टचे स्वतःचे १,२०० चालक हे खाली हात बसले असून त्यांना दर महिन्याला नियमित वेतन देण्यात येते.
त्यामुळे बेस्ट उपक्रमाने त्यांची दखल घेऊन या १,२०० चालकांना काम नसल्याने त्यांचा वापर यापुढे ज्या सरकारी व खासगी आस्थापनांना चालकांची आवश्यकता लागेल तेथे त्यांची भाडेतत्वावर उपलब्धता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
—- तर आंदोलनाचा इशारा
बेस्ट उपक्रमाच्या मुख्य व्यवस्थापक (वाहतूक) यांनी परिपत्रक काढून सरकारी व खासगी अस्थापनांना चालक भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रती चालक ९० रुपये सरकारी व खासगी अस्थापनांकडून आकारणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाविरोधात कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
१२ ऑक्टोबर रोजी परिवहन विभागाच्या प्रत्येक बस डेपोत निदर्शने करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शंशाक राव (Shashank Rao) यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.