Twitter : @NalavadeAnant

मुंबई

विधानसभेचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे असून या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होत असते, अनेक समस्या येथे सोडवल्या जातात. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करून चार ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी विधानसभेत केली.

सभागृहात चर्चेच्या दरम्यान बोलत असताना थोरात म्हणाले, विधिमंडळाचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे आहे, धोरणात्मक बाबीसोबतच अनेक आमदार आपल्या मतदारसंघाचे प्रश्न घेऊन सभागृहात बोलत असतात. सभागृह चालल्याने त्यांना संधी मिळते. उशिरापर्यंत सभागृह चालवले जाते, त्याबद्दल मी विधानसभा अध्यक्षांचे आभार व्यक्त करतो, मात्र चर्चा अधिक विस्ताराने होण्याच्या दृष्टीने आणि मतदारसंघातील प्रश्नांना अधिक न्याय मिळण्याच्या हेतूने अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करण्यात यावा. चार ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे, अशी सभागृहाच्या वतीने मी मागणी करतो, असेही थोरात यांनी यावेळी नमूद केले.

थोरात म्हणाले, आपण पाहिले असेल तर अधिवेशनामध्ये अनेक छोटे-मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्या प्रश्नांना या निमित्ताने वाचा फुटली. प्रशासन जागे झाले, गतिमान झाले. या अत्यंत चांगल्या गोष्टी आहेत. या सभागृहाचा हेतू प्रश्न सुटावे हा आहे. त्यामुळे अधिवेशन पूर्ण काळ चालवावे, जेणेकरून प्रत्येक सदस्याला न्याय देता येईल, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

बाळासाहेब थोरात विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असून त्यांना या सभागृहाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आपल्या भावना मांडू, त्यावर चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन विधानसभेचे अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here