@maharashtracity
मुंबई: परदेशातून राणी बागेत (Rani baug) आणण्यात आलेल्या पेंग्विनपैकी (Penguin) मादी पेंग्विनने जन्म दिलेल्या बच्चू पेंग्विनचा ‘नामकरण’ सोहळा २२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्या उपस्थितीत पेंग्विन कक्षात पार पडणार आहे.
या नामकरण सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या भाग्यवंत लोकांना पेढे, नाश्ता देण्यात येणार आहे. या बच्चू पेंग्विनच्या नावाची घोषणा महापौर करणार आहेत. कोविडच्या (Covid) सर्व नियमांचे पालन करून हा नामकरण सोहळा पार पडणार आहे.
यासंदर्भातील माहिती राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
केवळ बर्फाळ प्रदेशात बघायला मिळणाऱ्या पेंग्विनचे मुंबईकरांनाही दर्शन घडविण्याच्या हेतूने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या संकल्पनेतून कोरिया (Korea) येथून २०१७ मध्ये नर – मादी अशा ८ पेंग्विनचे आगमन भायखळा येथील राणीच्या बागेत खास उभारण्यात आलेल्या पेंग्विन कक्षात झाले होते.
सुरुवातीचे तीन महिने त्यांना तेथील कृत्रिम वातावरणात रुळवण्यात गेले. मात्र नंतर त्यांचे दर्शन मुंबईकरांसह देश – विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना घेता आले.
दरम्यानच्या कालावधीत एका पेंग्विनचा जंतू संसर्गाने दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडे पेंग्विनला बघ्यांच्या गर्दीत वाढ होत जाऊन पालिकेच्या उत्पन्नातही लाखोंची भर पडत गेली. तर दुसरीकडे पेंग्विनच्या मृत्यूमुळे विरोधकांकडून सत्ताधारी शिवसेनेवर (Shiv Sena), युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सुरू झाले.
दरवर्षी पालिकेच्या उत्पन्नात साडेचार ते पाच कोटी रुपयांची भर पडत आहे. त्यामानाने त्या पेंग्विनच्या देखभालीवरही काही कोटींचा खर्च दरवर्षी केला जातो. मात्र पर्यटकांना (tourist) मुंबईमधील वातावरणात परदेशातील पेंग्विन बघायला मिळतात व त्यामुळे बच्चे कंपनी आणि महिला वर्ग यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
सध्या राणी बागेतील पेंग्विन कक्षात ७ मोठे पेंग्विन आणि २ बच्चे (नर) असे ९ पेंग्विन असून त्यामध्ये ५ नर तर ४ मादी पेंग्विन यांचा समावेश आहे. या सर्व पेंग्विनची तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ यांच्या मार्फत विशेष काळजी घेण्यात येत आहे.
सुदैवाने आतापर्यंत ९ पेंग्विन सुखरूप आहेत. मे महिन्यात जन्मलेल्या छोट्या पेंग्विनचे नाव ‘ऑरिओ’ (Oreo) असे ठेवण्यात आले होते. तर ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या एका बच्चूने जन्म घेतला होता. आता ते बच्चू चार महिन्याचे व्हायला आले आहे.