@maharashtracity

मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून भयानक, घातक रंग दाखवणाऱ्या कोविडने (covid) अनेकांचे बळी घेतले. मात्र, आता कोविडचा प्रादुर्भाव खूपच कमी झाला आहे. त्यामुळे कोविडची बंधने झुगारून मुंबईकरांनी (Mumbaikar) आपल्या घराबाहेर पडून उत्साहात होळी व रंगपंचमी साजरी केली.

विशेष म्हणजे कोविडमुळे बाहेर पडू नका, असे आवाहन करणाऱ्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी स्वतः घराबाहेर पडून आपल्या मतदारसंघात महिला व बच्चे कंपनीसोबत रंग उधळत आणि “शिवसेना- शिवसेना” या गाण्यांवर हात उंचावून डान्स करीत रंगपंचमी साजरी केली.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे लॉकडाऊन (lockdown) लागून दोन वर्षे मुंबईकरांना होळी, रंगपंचमी इतर सण, उत्सव मुक्त वातावरणात साजरे करता आले नाहीत. मात्र, आता मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला असून रुग्ण संख्याही कमी झाली आहे. त्यातच राज्य सरकारने होळी, रंगपंचमी निमित्ताने जे काही निर्बंध घातले होते ते ऐनवेळी रद्द केल्याने लोकप्रतिनिधींसह उत्सवप्रेमींकडून मुंबईसह राज्यात उत्साहात होळी (Holi) व रंगपंचमी (Rang Panchami) साजरी करण्यात आली.

यावेळी मुंबईकरांसह माजी महापौर किशोरी पेडणेकर व त्यांच्या मतदारसंघातील मतदार, कार्यकर्ते आदींनी धोबीघाट येथे “शिवसेना ~शिवसेना ~” या गाण्यावर ठेका धरत हळुवार हातवारे करीत डान्सही केला. सर्वांनी माजी महापौरांसह रंगपंचमीचा, डान्सचा मनमुराद आनंद लुटला.

बुरा न मानो होली है -: महापौर

मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून कोविडचा संसर्ग असल्याने मी स्वतः मुंबईकरांना घराच्या बाहेर जास्त बाहेर पडू नका, काळजी घ्या, कोविड नियमांचे पालन करा, असे आवाहन केले. काही अपवाद वगळता मुंबईकरांनी दोन वर्षे खरेच नियमांचे चांगले पालन केले. कोविडवरील नियंत्रण वाढले, रुग्ण संख्याही कमी झाली. त्यामुळे आता मुंबईकर उत्साहात होळी, रंगपंचमी उत्साहात साजरी करीत आहेत, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

कोंकणात होळीच्या निमित्ताने पालख्या, सोंगं नाचवले जातात. गावात त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले जाते. मात्र नागरिकांनी रंगपंचमी सुक्या रंगानी खेळावी म्हणजे पाण्याची जास्त नासाडी होणार नाही, असे माजी महापौर पेडणेकर यांनी म्हटले आहे.

शेवटी एवढेच सांगेन की, “बुरा न मानो होली है”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here