@maharashtracity

बेस्टच्या प्रवासी संख्येत १ लाख ४७ हजारापेक्षाही जास्त वाढ
बेस्टच्या उत्पन्नात १२ लाख ९५ हजाराने वाढ

मुंबई: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अद्यापही सर्वसामान्य नागरिकांना लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय सरसकट रेल्वे प्रवास करण्यास मनाई आहे. त्यामुळे कष्टकरी, रोजंदार लोकांना बेस्ट बसशिवाय दुसरा पर्यायच नाही. परिणामी गेल्या काही दिवसात बेस्टच्या प्रवासी संख्येत १ लाख ४७ हजरांपेक्षाही जास्तीने वाढ झाली आहे तर बेस्टच्या उत्पन्नातही १२ लाख ९५ हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

दिनांक ३० ऑगस्ट रोजी बेस्ट परिवाहनचे उत्पन्न १ कोटी ९० लाख ८७ हजार ९१८ रुपये एवढे होते. तर, दिनांक ६ सप्टेंबर रोजी बेस्ट परिवहनचे उत्पन्न २ कोटी ३ लाख ८३ हजार ८८२ रु. पर्यंत वाढले आहे. त्यामुळे बेस्टच्या उत्पन्नात १२ लाख ९५ हजार रुपयांची वाढ झाल्याने तोट्यातील बेस्ट उपक्रमास थोडासा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

बेस्ट उपक्रमाने दिनांक १ सप्टेंबरपासून परिवहन विभागाच्या बसमार्गात अचानकपणे काही बदल केल्याने हजारो प्रवासी संतप्त झाले आहेत. तर नगरसेवक, लोकप्रतिनिधी नाराज झाले आहेत. त्याचे तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले होते.

मात्र अद्यापही सरकार व पालिकेने सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी दिलेली नाही. लसीचे दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना आजही बेस्ट बसगाड्यांमधून दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बस प्रवासी संख्येत व बेस्टच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

दिनांक ३० ऑगस्ट रोजी बेस्टच्या प्रवाशांची संख्या २३ लाख ७७ हजार १०२ एवढी होती तर ६ सप्टेंबर रोजी प्रवासी संख्येत वाढ होऊन ती २५ लाख २५ हजार ७४ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here