@maharashtracity
गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना तज्ज्ञांचा इशारा
मुंबई: मुंबई शहराचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index – AQI) २६२ एवढा नोंद करण्यात आला आहे. शहरातील माझगाव सारख्या ठिकाणी अतिशय प्रदुषित हवा (Polluted air) अशी नोंद झाली आहे. असे सलग तिसऱ्या दिवशी घडत असल्याने मुंबईची हवेची एकूणच गुणवत्ता ढासळली असल्याचे सांगण्यात येत आहे.
हवेत घातकी सुक्ष्मकणांचे प्रमाण वाढल्याने आरोग्याला धोका असून गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना श्वसनविकार तज्ज्ञ निर्वाणीचा इशारा देत आहेत.
लॉकडाऊनच्या (lockdown) काळात मुंबईतील हवेची गुणवत्ता थोडी फार सुधारली असताना लॉकडाऊन उघडल्यानंतर मुंबई शहर आणि उपनगरांत वाहनांची रेलचेल, इमारतींची कामे पायाभूत सुविधांशी निगडीत प्रकल्पामुळे उडणारी धूळ आणि धूर यामुळे मुंबईच्या प्रदूषणात कमालीची भर पडत आहे.
रविवारी मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २६२ एवढा नोंदला गेला. यातून मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. तर माझगावातील (Mazgaon) हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट म्हणजे ३४६ वर नोंदविण्यात आला. तर कुलाब्यातील (Colaba) हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३४१ एवढा आहे.
दरम्यान, मुंबई शहरातील प्रदूषणाची सरासरी पातळी २६२ निर्देशांकवर नोंदली गेली. यावरुन सलग तिसऱ्या दिवशी संपूर्ण मुंबईच्या परिसरांतील हवेचा दर्जा खालावलेला होता.
यावर बोलताना ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सांगितले की, अशा टोकाच्या प्रदुषणामुळे सीओपीडीच्या रुग्णांना अॅटॅक येऊ शकतो. प्रदुषणांचा फुप्फसावरच नव्हे तर हृदयावर ही दुष्परिणाम होत असतो.
प्रदुषणाचा श्वसन संस्थेसोबत शरिरातील सर्व संस्थेवर दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे त्रास असलेल्या रुग्णांनी मास्क (mask) जरुर वापरावा. गरोदर महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी अशा वेळी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गरोदर महिलांमध्ये हिमोग्लोबिन (Haemoglobin) कमी असतो.
अशा वेळी प्रदुषित हवा शरिरात गेल्यास गरोदर महिलेला तसेच गर्भावर दुष्परिणाम होऊ शकतो. अशा वेळी सहसा घरा बाहेर न पडता प्रदुषित हवेत फिरणे टाळावे असे डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सांगितले.
संपूर्ण मुंबई शहर २६२ एक्यूआय
भांडूप ११८ एक्यूआय
कुलाबा ३४१ एक्यूआय
मालाड ३०९ एक्यूआय
माझगाव ३४६ एक्यूआय
वरळी १३५ एक्यूआय
बोरीवली १७६ एक्यूआय
बीकेसी २६२ एक्यूआय
चेंबूर २०४ एक्यूआय
अंधेरी २०१ एक्यूआय
नवी मुंबई २२१ एक्यूआय