सकाळी सहा ते दहा या वेळेतच प्रवेश

१ जूनपासून समुद्रात ७ जणांचा मृत्यू

@maharashtracity

मुंबई: मुंबईत पावसाळ्यात समुद्र चौपाट्यांवर (chowpaty) पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. मात्र, या गर्दीतील काही अतिउत्साही पर्यटकांचा (tourist) समुद्रात खोल पाण्यात पोहण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या दुर्घटना घडत आहेत. १ जूनपासून आतापर्यंत मुंबईत समुद्रात बुडून सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आगामी तीन दिवसांत हवामान खात्याने मुंबईत ‘रेड अलर्ट ‘ (red alert) जारी केला आहे. याची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त इकबाल चहल (I S Chahal) यांनी, पावसाळ्यात ‘रेड व ऑरेंज’ अलर्ट असताना चौपाट्यांवर सकाळी ६ ते १० ही वेळ वगळता इतर वेळी फिरण्यास निर्बंध घातले आहेत.

त्यामुळे भर पावसाळ्यात समुद्रात उतरून पोहण्याचा आनंद लुटण्याच्या बेतात असलेल्या पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडणार आहे. मात्र, दुसरीकडे पालिका आयुक्त यांनी, समुद्रात बुडून एखाद्याचा होणारा मृत्यू टाळण्यासाठी घेतलेला निर्णय हा योग्य असल्याचे पालकांचे मत असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईत जुहू, गिरगाव, आक्सा, दादर, वर्सोवा, माहिम आदी चौपट्या आहेत. पावसाळ्यात हौशी पर्यटक, तरुण मंडळी, बच्चे कंपनी चौपाट्यांवर जाऊन समुद्रात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी उतरतात. त्यांना मौजमजा करताना समुद्राच्या खोल पाण्याचा व समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीचा अंदाज येत नाही. परिणामी काही वेळा तरुण मुले, महिला, लहान मुले हे समुद्राच्या लाटांच्या कचाट्यात सापडून बुडतात व त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत होतो. तर त्यातील काहीजणच सुखरूपपणे बाहेर येतात अथवा लाईफगार्डमुळे ते बचावले जातात.

पावसाळ्यात समुद्राला मोठी भरती असते. अशावेळी अथवा अतिवृष्टीचा धोका असताना समुद्रात गेल्यास जीविताला धोका उद्भवू शकतो. मुंबईत यंदा १ जूनपासून ते आतापर्यन्त चौपाटीच्या ठिकाणी समुद्रात दादर चौपाटी व आक्सा चौपाटी येथे प्रत्येकी १ – १ जण, जुहू कोळीवाडा येथे २ जण तर जुहू चौपाटी येथे ३ जण असे एकूण ७ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर काहीजण सुदैवाने बचावले आहेत.

हवामान खात्याने आगामी तीन दिवसात ‘ऑरेंज आणि रेड अलर्ट’ चा इशारा दिला आहे. अशावेळी समुद्रकिनारे फक्त सकाळी ६ ते सकाळी १० या वेळेतच सर्वसामान्यांसाठी खुले राहतील, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पालिकेने विविध समुद्र चौपाट्यांच्या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी ९४ लाईफ गार्ड नेमले आहेत. तसेच, पोलीस व पालिका कर्मचारी यांची देखरेख असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here