पालिकेच्या सायन रुग्णालयात तब्बल साडेसहा तास अवघड शस्त्रक्रिया
Twitter @maharashtracity
मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयात पंधरा वर्षीय तरुणाच्या मानेवर व खांद्यावर जन्मजात असलेली एक गाठ तब्बल सहा तासांच्या शस्त्रक्रियेने काढण्यात आली. आता हा रूग्ण पूर्ण बरा होण्याच्या मार्गावर असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.
सायन रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एक तरुण उपचारांसाठी आला. जन्मापासून त्याच्या खांद्यावर आणि मानेजवळ असणारी गाठ वाढत वाढत आता वयाच्या १५ व्या वर्षी सव्वादोन किलोची झाली होती. त्या गाठीमुळे त्याला प्रत्यक्ष त्रास होत नसला, तरी विद्रुप दिसणाऱ्या त्या गाठीचा तरुणाच्या व्यक्तिमत्वावर प्रतिकूल परिणाम होत होता. त्या गाठीची होणारी वाढ आणि आकार बघून तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल, असे रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितलं. रुग्णाच्या कुटुंबीयांच्या सहमतीनंतर त्या तरुणावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. सायन रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागासह इतर विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली. तब्बल साडेसहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेअंती जन्मापासून असलेली त्या तरुणाच्या मानेवरची गाठ काढली गेली.
अधिक माहिती देताना डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर २०२३ रोजी या १५ वर्षीय तरुणाच्या मानेवर डाव्या बाजूला जन्मापासून गाठ असल्याने उपचाराकरीता आणण्यात आले. ही गाठ हळूहळू वाढत होती. परंतू त्याचा रुग्णास त्रास नव्हता. रुग्ण तपासणी करीता आला असता ही गाठ ‘२२ सेंटीमीटर x ३० सेंटीमीटर’ इतकी वाढली होती. या गाठीमुळे रुग्णाची श्वसन-नलिका मूळ जागेपासून उजव्या बाजूला पूर्णपणे झुकली होती. सुदैवाने रुग्णास श्वासोच्छवासास त्रास होत नव्हता. रुग्णाच्या आवश्यक रक्त व इतर तपासण्या करण्यात आल्या असता ही गाठ म्हणजे ‘लिम्फॅटिक सिस्टिम’ व रक्त वाहिन्या यांचे जाळे आहे, असे ‘एमआरआय’ तपासणीत आढळून आले. ही गाठ मानेतील एक मुख्य रक्त वाहिनी (नीला) म्हणजेच ‘इंटर्नल जुगुलर व्हेन’ या शिरेपासून वाढत होती.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ‘सुघटन शल्य चिकित्साशास्त्र चिकित्सक’ (Plastic surgery), उरोशल्य चिकित्साशास्त्र चिकित्सक (सी.वी.टी.एस.), व्हॅस्क्युलर इंटरवेंशनल रेडिओलॉजीचे तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ यांनी चर्चा करुन व त्यातील धोके ओळखून शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाच्या जीवास धोका असल्याची रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांस संपूर्ण कल्पना दिली. त्याचबरोबर शस्त्रक्रियेसाठी रुग्णाच्या कुटुंबीयांनी लेखी संमती घेण्यात आली. तसेच पुरेशा रक्ताची तरतूद करुन उरोशल्य चिकित्साशास्त्र विभागाच्या शस्त्रक्रियागृहात शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. त्यानुसार गेल्याच आठवड्यात संपूर्ण तयारीनिशी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अंदाजे साडेसहा तास सुरू होती.
शस्त्रक्रिये दरम्यान गळ्याभोवती असणाऱ्या इतर अतिशय महत्त्वाच्या रक्त वाहिन्या, चेतापेशी आणि मांसपेशी यांना कुठेही धक्का न लावता कौशल्याने पार पाडण्यात आली. ही गाठ जवळजवळ ५ पाउंड (सव्वा दोन किलो) वजनाची होती. आता गाठ काढल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून तो आता पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर आहे. अत्यंत अवघड आणि कठीण असणारी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्याबद्दल रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबीयांनी शीव रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले.