@maharashtracity
मुंबई: मुंबईत कोरोनावर नियंत्रण आल्याने तब्बल ७ महिन्यांनी राणी बागेचे (Rani baug) गेट पर्यटकांसाठी १ नोव्हेंबरपासून उघडले आहेत. त्यामुळे राणी बागेत पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. १ ते १० नोव्हेंबर (साप्ताहिक सुट्टी बुधवारी) या कालावधीत राणीच्या बागेत ५० हजार ७९६ पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यातून पालिका तिजोरीत २१ लाख १८ हजार ३७५ रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहेत.
त्यामुळे सरासरी काढल्यास दर दिवशी ५ हजार पर्यटकांची गर्दी होत असून त्याद्वारे पालिकेला दररोज २ लाखांपेक्षाही जास्त उत्पन्न मिळत आहे. आनंदाची बाब म्हणजे कोरोनाच्या (corona) सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे केंद्राच्या आदेशाने राज्य सरकारने मुंबईत काही निर्बंध घातले होते. त्यामुळे प्रथमतः २३ मार्च २०२० पासून सुरक्षिततेच्या कारणास्तव राणी बाग बंद करण्यात आली.
त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला व राणी बागेचे बंद केलेले गेट पुन्हा १५ फेब्रुवारी २०२१ पासून उघडण्यात आले होते. मात्र, नंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व राणी बागेचे गेट ४ एप्रिल २०२१ पासून पुन्हा बंद करण्यात आले होते.
आता पुन्हा एकदा कोरोनावर नियंत्रण आल्याने व कोरोनाची तिसरी लाट रोखून धरण्यात पालिका आरोग्य यंत्रणेला यश आल्याने १ नोव्हेंबरपासून राणी बागेचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडण्यात आले.
दिनांक १ नोव्हेंबर रोजी पहिल्याच दिवशी राणीच्या बागेत १ हजार ६२१ पर्यटकांनी (tourist) भेट दिली होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी पालिकेच्या तिजोरीत ६८ हजार ७२५ रुपयांची कमाई जमा झाली होती.
दिनांक १ ते १० नोव्हेंबर या कालावधीत राणीच्या बागेत ५० हजार ७९६ पर्यटकांनी भेट देऊन प्राणिसंग्रहालयात पक्षी, पेंग्विन (penguin), प्राणी यांच्यासोबत आनंद लुटला. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत २१ लाख १८ हजार ३७५ रुपयांचे उत्पन्न जमा झाले.
या संदर्भातील माहिती राणी बागेतील प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.