मुंबई: अंधेरी (प.), जुहू गल्ली येथील एका चाळीच्या ठिकाणी चारमजली निर्माणाधिन इमारतीचे बांधकाम रात्रीच्या सुमारास अचानक कोसळले. (Andheri building collapse) या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, मुंबई शहर भागात – २ ठिकाणी, पश्चिम उपनगर भागात – १ ठिकाणी तर पूर्व उपनगरात – १ ठिकाणी अशा एकूण ४ ठिकाणी घरे, इमारती, त्यांचे भाग पडण्याच्या घटना घडल्या आहेत.

मुंबई अग्निशमन दलाकडून प्राप्त माहितीनुसार, अंधेरी (प.), जुहू गल्ली, सलामी हॉटेल, अमर सोसायटी, मेहता बाबा चाळ येथे तळमजला अधिक तीन मजली असे एकूण चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. मात्र मंगळवारी रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास नागरिक झोपेत असताना या इमारतीचे बांधकाम समोरील ६ घरांवर अचानक कोसळले. त्यामुळे एकच आरडाओरड झाली.

आजूबाजूच्या घरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता इमारतीचे बांधकाम काही घरांवर कोसळल्याचे पाहून त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत शेख कुटुंबातील ५ जण जखमी झाले. तर काहीजण थोडक्यात बचावले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी सहाय्यक आयुक्त, ४ फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन, ६ अभियंते, २ दुय्यम अभियंते, कनिष्ट अभियंते आणि ७५ कामगार यांच्या माध्यमातून मदतकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेत, अकबर शेख (६०), चांद शेख (३४), अजरा शेख (१८),आरिफ शेख (१८) आणि शमशुद्दीन शेख (५०) हे ५ जण जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here