@maharashtracity

मुंबई: “पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने (e-Vehicle) ही काळाची गरज असून नागरिकांनी दैनंदिन जीवनात पर्यावरण पूरक (eco friendly) वाहने व अन्य बाबींचा जास्तीत-जास्त वापर करावा,” असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांनी केले आहे.

बेस्ट उपक्रमाच्या (BEST Undertaking) परिवहन विभागात इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश काही कालावधीपूर्वी करण्यात आला आहे. आता बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिकेच्या (BMC) वाहन ताफ्यातही शुक्रवारी ५ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.

या कार्यक्रमाला, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समितीच्या अध्यक्ष संध्या दोशी, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, सुरेश काकाणी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सचिव अशोक शिनगारे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. संगीता हसनाळे, उपआयुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) अशोक यमगर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई महापालिकेच्या वाहन ताफ्यात सध्या ९६६ वाहने आहेत. यामध्ये पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) व सीएनजी (CNG) इंधनावरील वाहनांचा समावेश आहे. आजपासून या वाहन ताफ्यात ५ इलेक्ट्रिक वाहनांची भर पडली आहे.

‘टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लस’ व्हेईकल या मॉडेलची ही ५ वाहने आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीकडून ‘ड्राय-लीज’ पद्धतीने या वाहनांची सवलतीच्या दरात खरेदी करण्यात आली आहे.

या वाहनांसाठी दरमहा रुपये २७ हजार इतका खर्च येणार आहे. यामध्ये परिरक्षण व दुरुस्तीचा देखील समावेश आहे. या वाहनांमध्ये परंपारिक खनिज तेल वापरण्यात येत असल्यामुळे या वाहनातून हरित वायू, कार्बनडायऑक्साईड इत्यादी प्रतिकूल वायुंचे उत्सर्जन होत नाही. ही वाहने साधारणपणे पुढील ८ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here