@maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या साप्ताहिक आरोग्य अहवालानुसार साथीच्या आजारांमध्ये आठवडाभरात किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत साथरोग रुग्ण वाढ झाली नसल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी मलेरियाचे सर्वाधिक म्हणजे ३९८ तर त्या पाठोपाठ गॅस्ट्रोचे २०८ रुग्ण नोंदविण्यात आले असल्याचे या अहवालातून सांगण्यात आले.
मागील आठवड्यापासून पावसाची सुरू असलेली रिपरिप आणि त्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याच्या परिणामातून मुंबईकरांनी ताप, खोकला, घसा दुखणे, घशामध्ये खवखवणे, शरीर दुखणे, डोकेदुखी असे सर्दी सदृश्य तक्रारी केल्या. तर जुलाब, उलटीचा त्रासाच्या तक्रारी देखील करण्यात आल्या. १८ सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे ३९८, लेप्टो २७, डेंग्यू १३९, गॅस्ट्रो २०८, हेपाटायटीस ४५, चिकनगुनिया २ तर एच१एन चे ६ रुग्णांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. यातून मुंबईत साथीच्या आजारा प्रभाव दिसून येत आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला मुंबईत अधून-मधून कोसळलेला पाऊस त्यानंतर सष्टेंबरच्या सुरुवातीला पावसाची उघडीप यातून साथीच्या आजारांमध्ये वाढ झालेल्याचे दिसून आले होते. यात या आठवड्यात किंचित फरक पडलेला दिसून येत आहे. तसेच मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या आहेत. मच्छरदाण्या, खिडक्यांचा काचा लावून घेण्याबरोबरच नागरिकांनी संपूर्ण शरीरभर कपडे परिधान करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
आपल्या परिसरामध्ये पाणी साचून मच्छरांची पैदास होणार नाही याची काळजी घ्या, परिसर स्वच्छ व साफ ठेवा, थर्मकोल बॉक्सेस, नारळाच्या करवंट्या, डब्बे, टायर आणि वापरात नसलेल्या वस्तू नष्ट करण्याच्या सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. मलेरिया व डेंग्यू या दोन्ही आजारांचा प्रसार हा डासांमुळे होतो. यापैकी मलेरिया या आजाराचा प्रसार ‘एनोफिलीस’ डासांमुळे, तर डेंग्यूचा प्रसार ‘एडिस’ डासांमुळे होतो.
पालिका प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी देखील विशेषतः आपापल्या घर सोसायटीच्या परिसरात पाणी साचू देवू नये. डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करावीत. डास प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. जेणेकरुन डासांची उत्पत्ती थांबून आजारांचा प्रसार होणार नाही, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.