@maharashtracity

मुंबई: चारकोप, कांदिवली येथे तुंबलेल्या शौचालयाच्या टाकीची साफसफाई करताना टाकीत पडून ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलीस व अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे. यासंदर्भातील माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, कांदिवली (पश्चिम), चारकोप, लिंक रोड, अथर्व कॉम्प्लेक्ससमोरील एकता नगर येथे पालिकेच्या सुलभ शौचालयाची टाकी तुंबल्याने ती साफ करण्याचे काम एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले होते. या कंत्राटदाराने काही कामगार शौचालयाची तुंबलेली टाकी (lavatory tank) साफ करण्यासाठी पाठवले होते.

हे कामगार गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास टाकी साफ करीत असताना त्यापैकी एक कामगार तोल गेल्याने अचानकपणे टाकीत पडला. त्याला वाचविण्यासाठी इतर दोन कामगार मदतीला धावले. मात्र तेसुद्धा तोल जाऊन त्याच टाकीत पडले. त्यांच्या नाकातोंडात टाकीतील घाण गेल्याने व त्यांचा श्वास कोंडला गेला.

स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी त्या तिघांना काही वेळाने टाकीतून बाहेर काढून नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (जुने शताब्दी) रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर राहुल यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या मृत कामगारांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

सुदैवाने चौथा कामगार त्या टाकीत पडता पडता बचावल्याचे भाजपचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी सांगितले.

ठोस उपाययोजना आवश्यक

इमारत बांधकाम करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कामगारांना सेफ्टी बेल्ट बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मोठे नाले, विहीरी, शौचालयांच्या टाक्या (toilet tanks) आदींची साफसफाई करतानाही कामगारांना (labours) सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ्टी बेल्ट लावणे बंधनकारक करावे. तसेच, साफसफाईची कामे करताना दुर्दैवाने जर कामगारांचा मृत्यू झाल्यास त्या कामगारांच्या कुटुंबियांना संबंधित कंत्राटदाराने आर्थिक मदत, भरपाई द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक कमलेश यादव (Kamlesh Yadav) यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here