@maharashtracity
मुंबई: मुंबईत कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona) नियंत्रणात आलेली असताना तिसऱ्या लाटेची भिती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र भायखळा येथील अनाथाश्रम शाळेतील आग्रीपाडा येथील अनाथाश्रमातील १६ मुलांसहा २२ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची घटना ताजी असताना आता चेंबूर येथील बालगृहातील १८ मुलांनाही कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व मुलांना वाशी येथील कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्यामुळे आता मुंबईतील धर्मशाळा, अनाथाश्रम, बालगृहे ही रडारवर आली आहेत.
प्राप्त माहीतीनुसार, चेंबूर (Chembur) येथील बालगृहातील एका मुलाची तब्येत बिघडली असल्याचे लक्षात आल्यावर पालिका आरोग्य पथकाने शनिवारी तात्काळ याठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले. तपासणी व चाचणीअंतर्गत १८ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे पालिका प्रशासन ही हादरले आहे.
दरम्यान, पालिका आरोग्य यंत्रणेने या सर्व मुलांना तात्काळ उपचारासाठी वाशीनाका येथील कोरोना केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. संपूर्ण मुंबईत गेल्या तीन दिवसात ३४ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
यामध्ये, चेंबूर येथील बालगृहातील १८ मुले व त्याअगोदर आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ अनाथाश्रमातील १६ मुलांचा समावेश आहे.
दरम्यान, पालिका आरोग्य यंत्रणेने चेंबूर बालगृहातील १०२ मुलांची तपासणी केली असता त्यामध्ये १८ जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. सुदैवाने उर्वरित ८४ मुलांना कोरोनाची बाधा झालेली नाही.
मात्र आता मुंबईतील बालगृहे, अनाथाश्रम ही पालिकेच्या रडारवर आली आहेत. आता या सर्व ठिकाणीही मुलांची आरोग्य तपासणी करणे आवश्यक झाले आहे.