Twitter: @SantoshMasole
धुळे: शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या ‘जैसे थे’च असून वर्षाची पाणीपट्टी मात्र वसूल केली जाते. हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) आज आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी आयुक्तांच्या दालनासमोर आंघोळ करून महापालिकेच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनाचा आशय असा-गेल्या अनेक महिन्यापासून शहराच्या विविध भागात दहा ते बारा दिवस उलटूनही पिण्याचं पाणी मिळत नाहीये, महिलांना भर उन्हात आरोग्य धोक्यात घालून पाण्यासाठी वणवण भटकावे लागतं आहे.
महापालिका निवडणुकीवेळी मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करू असे जनतेला आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची पूर्तता झाली नाहीच, उलट महापालिका मात्र रहिवाशांकडून वर्षभराचा पाणी कर वसूल करते आहे. ३६५ दिवसांची पाणीपट्टी आकारताना प्रत्यक्ष पन्नास दिवस तरी पाणी पुरवले का? याचा विचार व्हायला हवा.
पाण्याची समस्या उद्भवली की पालिकेच्या (Dhule Municipal corporation) अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन केला असता अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देतात, वीज नसल्याचे कारण देत टाळाटाळ करतात, वीज हीच समस्या असेल तर महापालिकेने महावितरणसोबत (Mahavitaran) चर्चा करून हा प्रश्न त्वरित सोडवावा.
शहरवासीयांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी धुळेकरांना विकासाची मोठी स्वप्ने दाखवली, परंतु साधं जनतेच्या हक्काचं पाणी देऊ शकले नाही, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. मनपाने (DMC) लवकरात लवकर पाण्याची समस्या सोडवली नाही, तर नागरिकांना घेऊन आयुक्तांच्या दालनासमोर येऊ व दररोज आंघोळ करू, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी गौरव गिते, हर्षल परदेशी, शामक दादाभाई, भावेश गद्रे, आदीत्य विरगावकर, राहुल बागुल, प्रशांत तर्नना, रुषिकेश कानकाटे, गणेश जाधव, शुभम माळी हे उपस्थित होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) जिल्हा सचिव गौरव अनिल गिते यांनी कळविले आहे.