रु ८४००० च्या व्हेंटिलेटरसाठी मोजले रु १८ लाख
४५ रुपयांच्या मास्कसाठी मोजले रु ३७० तर
३५० रुपयांचे पीपीई किटसाठी मोजले रु १६००
@vivekbhavsar
मुंबई: कोरोना (corona) संकटाला अतिशय धैर्याने आणि नियोजनबद्धरित्या सामोरे गेल्याने महाराष्ट्र (Maharashtra) या संकटातून बाहेर पडला अशी स्वतःचीच कौतुकाने पाठ थोपटून घेणाऱ्या ठाकरे (Thackeray) सरकारला खास करून राज्यातील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमताने गंडवले की काय अशी शंका उपस्थित व्हावी, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
कोरोना काळात बेहिशेबी पद्धतीने मास्क (mask), पीपीई किट (PPE Kit) आणि व्हेंटिलेटरची (Ventilator) खरेदी करण्यात आली. ही खरेदी करतांना अव्वाच्या सव्वा रक्कम मोजण्यात आल्याचे कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट होत आहे. ही कागदपत्रे thenews21 च्या हाती लागली आहेत.
जिल्हानिहाय मास्क खरेदी दर
राष्ट्रीय आरोग्य अभियान या विभागाच्या आयुक्तांनी कोविड काळात राज्यात विविध जिल्ह्यात खरेदी करण्यात आलेल्या मास्क, पीपीई किट आणि व्हेंटिलेटरची संख्या आणि त्यासाठी मोजण्यात आलेली रक्कम याची माहिती दिली आहे.
एन-९५ (N-95) मास्कची खरेदी करण्याचे अधिकार शहरी भागासाठी जिल्हा शल्यचिकित्सक (Civil Surgeon) आणि ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्यधिकारी (District Health Officer) यांना देण्यात आले होते. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात ही खरेदी केली आहे. आयुक्तांनी दिलेल्या लेखी माहितीनुसार, बुलढाणा (Buddhana), यवतमाळ (Yavatmal) (ग्रामीण), नांदेड (Nanded) (ग्रामीण), नाशिक (Nashik) (शहर आणि ग्रामीण), कोल्हापूर (Kolhapur) (ग्रामीण), रायगड (Raigad), पालघर (Palghar), ठाणे (Thane) ग्रामीण या ठिकाणी ४२ रुपयांना एक मास्क या दराने खरेदी करण्यात आले आहेत. ही खरेदीतील सर्वात कमी किंमत आहे.
कागदपत्र दर्शवितात की जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एका मास्क साठी ३७० रूपे मोजले तर ठाणे जिल्हा आरोग्यधिकारी यांनी एका मास्क साठी ३१८ रुपये मोजले. “कोरोना संसर्ग मोट्या प्रमाणात होता त्या काळात म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत एन-९५ या मास्कची मेडिकल दुकानात सर्वसामान्य नागरिकांसाठी सरासरी किंमत ४९ ते ६५ रुपये किंमत होती,” अशी माहिती एका मेडिकल दुकानदाराने दिली. तर शासकीय खरेदीचा कमीत कमी दर ४२ रुपये होता. याचा अर्थ एका मास्क च्या मागे किमान ३०० रुपये जादा देण्यात आले.
जिल्हानिहाय पीपीई किट खरेदी दर
हीच बाब पीपीई किटबाबत दिसून येत आहे. किमान ३५० रुपयांना मिळणाऱ्या या किटसाठी सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी २००० रुपये मोजले आहेत. रत्नागिरीने १९५० रुपये, ठाण्याने ११९८ रुपये मोजले आहेत.
व्हेंटिलेटर खरेदी दर
बाजारात एका व्हेंटिलेटरची किंमत सरासरी ६ लाख रुपये असतांना रायगड, ठाण्यात एका व्हेंटिलेटरसाठी १८ लाख रुपये मोजण्यात आले. उस्मानाबादमध्ये रु १७ लक्ष ५० हजार रुपये तर पुणे आणि अहमदनगरने प्रत्येकी रु १६ लाख ५० हजार रुपये मोजण्यात आले. परभणी जिल्हा शल्यचिकित्सक यांना तर ८४००० रुपयांत एक व्हेंटिलेटर मिळाले आणि असे त्यांनी १० व्हेंटिलेटर खरेदी केले होते.
ही सर्व खर्चाची आकडेवारी जुलै २०२० अखेरची आहे. जुलैनंतर खर्च झालेल्या खर्चाची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही.