@maharashtracity
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुनम राऊत (45) आणि ऑफस्पिनर समृद्धी राऊळ (19 धावांत 3 विकेट्स) यांच्या चमकदार खेळाच्या बळावर स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबने मुंबई पोलीस जिमखान्याचा Mumbai Police Gymkhana) 9 विकेटने पराभव करून अजित घोष स्मृति चषक महिला टी-ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद सहज जिंकले.
स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पोलीस जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 100 अशी काहीशी तोकडी धावसंख्या फळ्यावर लावली. स्पोर्ट्सफिल्डने (Sportsfield Cricket Club) हे लक्ष्य 15.3 षटकांमध्ये पार केले. पूनमने आचल वळंजू (नाबाद 44) हिच्यासह 88 धावांची सलामी दिली. त्यावरच विजेतेपदाचा निकाल लागला.
पोलीस जिमखान्याने तशी दमदार सुरुवात केली. क्षमा पाटेकर (39) आणि सृष्टी नाईक (26) यांनी 66 धावांची भागीदारी केली पण त्यानंतर समृद्धी राऊळच्या गोलंदाजीवर श्वेता कलपती हिने दोघींना यष्टीचीत करून स्पोर्ट्सफिल्डला वरचष्मा मिळवून दिला. पोलीस संघाच्या 3 खेळाडू मग धावचीत झाल्याने त्यांचा डाव अक्षरशः कोलमडला. पुनम राऊतला आज सूर गवसल्याने स्पोर्ट्सफिल्डला विजयासाठी फार त्रास झाला नाही. तिच्या अनुभवाचा लाभ संघाला नक्कीच झाला.
या स्पर्धेमध्ये ठाणे स्पोर्टिंग क्लबची निव्या आंब्रे सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिने दोन अर्धशतकांसह १२४ धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. रिचा चौधरी (140 धावा) आणि समृद्धी राऊळ (11 विकेट्स) या अनुक्रमे उत्तम फलंदाज आणि गोलंदाज ठरल्या. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ भारताच्या माजी खेळाडू संगीता मुंबई क्रिकेटचे अपेक्स कौन्सिलचे सदस्य कौशिक गोडबोले आणि अभय हडप तसेच युरोपम कंपनीचे संचालक भूवल पटेल यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी प्रशांत सावंत आणि मंगेश साटम हे मान्यवर उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक
मुंबई पोलीस जिमखाना: 20 षटकांत 7 बाद 107( क्षमा पाटेकर 39, सृष्टी नाईक 26, निधी बुळे 17; समृद्धी राऊळ 19/3) पराभूत विरुद्ध स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब : 15.3 षटकात एक बाद 101 (पुनम राऊत 45 आचलवळ नाबाद 44) सामन्यात सर्वोत्तम :समृद्धी राऊळ.