@maharashtracity
धुळे: मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) हाडाखेड गावाजवळ शिरपूर तालुका पोलिसांनी एक संशयित मालमोटार पकडली. त्यातून तब्बल 43 लाख 38 हजार रुपयांची सुगंधित तंबाखू व गुटखाजन्य पानमसाला जप्त करण्यात आला.
त्याअधीच मालमोटारीचा चालक पसार झालेला असल्याने अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड गावाजवळ एका हॉटेलशेजारी एक मालमोटार संशयितरित्या उभा असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांनी मिळाली. त्याआधारे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, असई नियाज शेख, पोहेको संजीव जाधव, पोहेको संजय देवरे, पोना आरीफ पठाण, पोको संतोष पाटील यांनी सदरची एचआर.एसएस/एस.4908 या मालमोटारीची तपासणी केली.
त्यात तब्बल 43 लाख 38 हजार रुपयांची जाफरानी तंबाखु जर्दा व सुगंधीत गुटखाजन्य पानमसाला आढळून आला.
यानंतर पुढील कार्यवाहीकरीता पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे येथील अन्न सुरक्षा अधिकारी के.एस.बाविस्कर यांना बोलवून घेतले. त्यांनी संपूर्ण मालाची तपासणी केली असता संशयीत मालमोटारीमध्ये सुगंधित तंबाखू व गुटखाजन्य पानमसाला असल्याचे निष्पन्न झाले.
यामुळे 43 लाख 38 हजारांची सुगंधित तंबाखू व 15 लाखांची मालमोटार, असा एकूण 58 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चालकाविरुध्द शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.