मानवसाखळी करुन शासनाच्या विरोधात व्यक्त केल्यात भावना
@maharashtracity
धुळे
जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य प्रमुख मागगण्यांसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समिती धुळेतर्फे बुधवारपासून दोन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. यावेळी संपकरी कर्मचार्यांनी शिवतिर्थाला मानवसाखळी करुन शासनाच्या विरोधात भावना व्यक्त केल्या. यानिमित्त कर्मचार्यांच्या एकजूटीचे दर्शन घडले.
या संपात राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक डॉ.संजय पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, सुधीर पोतदार, राजेंद्र माळी, दीपक पाटील, एस.यू.तायडे, वाल्मिक चव्हाण, मोहन कापसे, उज्वल भामरे, कल्पेश माळी, संजय कोकणी, संजय पवार, प्रतिभा घोडके, किशोरी अहिरे, पल्लवी साबळे, आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कर्मचार्यांच्या या संपामुळे सरकारी व निमसरकारी कामकाज ठप्प झाले आहे. या संपाची पुर्वसूचना शासनाला काही दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. त्यानंतरही शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने बुधवारपासून दोन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी आपापल्या कार्यालयावरुन शहरातील कल्याण भवनात जमले. या ठिकाणी जाहीर सभा झाली. यावेळी सर्व घटक व संवर्ग संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्यांनी संपाच्या संदर्भात आपल्या संतप्त भावना मनोगतातून व्यक्त केल्या. तसेच शिवतिर्थाला मानवसाखळी करुन शासनाच्या विरोधात भावना व्यक्त केल्या.
या संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट (चतूर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, माध्यमिक शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघअना, प्राथमिक शिक्षक समिती, महिला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, लघुलेखक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ कर्मचारी संघटना, समाजसेवा अधीक्षक संघटना, औषध निर्माता संघटना, स्वच्छता निरीक्षक संघटना, प्रयोगशाळा सहायक संघटना, वर्ग 4 कर्मचारी संघटना, सफाईगार कर्मचारी संघटना, पोलिस अधीक्षक मंत्रालयीन कर्मचारी संघटना, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी वर्ग 3 व 4 संघटनेचे कर्मचारी सहभागी झालेत.