@maharashtracity

महापालिकेचे नवे घोषवाक्य

१००% लसीकरण झालेल्या सोसायटयांवर लागणार आकर्षक भित्तीपत्रक

मुंबई: मुंबई शहर व उपनगरात ज्या सोसायट्यांमध्ये १००% लसीकरण झाले आहे, अशा सोसायटयांच्या गेटवर, दर्शनीय ठिकाणी मुंबई महापालिकेकडून ‘माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी’ (My society, responsible society) या संदेशासह ढालीचे चित्र असलेले भित्तीपत्रक लावण्यात येणार आहे.

हे भित्तीपत्रक म्हणजे एकप्रकारे १०० टक्के लसीकरण झालेल्या सोसायट्यांसाठी ही निश्चितच अभिनंदनीय, अभिमानास्पद आणि अनुकरणीय बाब आहे. आता मुंबईतील इतर सहकारी गृहरचना संस्थांनी देखील लवकरात लवकर १०० टक्के लसीकरणाचे ध्येय गाठावे, असे आवाहन राज्याचे पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले आहे

मुंबई महापालिका मुख्यालयात १०० टक्के लसीकरण झालेल्या सोसायट्यांवर लावावयाच्या भीती पत्रकांचे पर्यावरण व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर Mayor Kishori Pednekar), उपमहापौर सुहास वाडकर, खा. अरविंद सावंत, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सभागृह नेता विशाखा राऊत, विरोधी पक्षनेता रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटनेता राखी जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील नागरिकांचे लसीकरण वेगाने व्हावे, यासाठी सर्वस्तरीय विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जास्तीत जास्त जनजागृती होण्याकरिता ‘माझी सोसायटी, जबाबदार सोसायटी’ आणि ”My Society, Responsible Society” असा संदेश असलेली मराठी व इंग्रजी भाषेतील भित्तीपत्रके प्रकाशित करण्यात आली आहेत.

ही भित्तीपत्रके महापालिकेच्या सर्व २४ विभागांमधील ज्या सहकारी गृहरचना संस्थांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे, अशा सोसायट्यांच्या दर्शनी भागी लावण्याचे आदेश यापूर्वीच सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले होते, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याप्रसंगी दिली.

या भित्तीपत्रकांवर संबंधित सहकारी संस्थेचे नाव नमूद करून त्यावर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची किंवा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांची स्वाक्षरी असणे व महापालिकेची मुद्रा असणे बंधनकारक आहे.

याच ‘पोस्टर’वर एक ‘क्यू आर कोड’ असून तो आपल्या भ्रमणध्वनीच्या सहाय्याने स्कॅन केल्यावर भ्रमणध्वनीमध्ये https://stopcoronavirus.mcgm.gov.in/vaccination हे संकेतस्थळ उघडले जाणार आहे. या लिंक वर ती गृहरचना संस्था ज्या परिसरामध्ये आहे, त्या परिसरातील लसीकरण केंद्रांची माहिती उपलब्ध असणार आहे, असेही श्री. काकाणी यांनी यानिमित्ताने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here