@maharashtracity

आज किमान तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज

मुंबई: सध्या मुंबईत किमान तापमान १९ वर तर कमाल २९ अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत थंड वाऱ्यांचा प्रभाव दिवसभर जाणवत आहे. या प्रभावामुळे रविवारी किमान तापमान आणखी खाली जाईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

रविवारी १८ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद होण्याचा अंदाज असल्याने या मोसमातील हा पहिला थंड रविवार (coolest Sunday) गणला जाईल.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत थंडीचा जोर वाढला असून गुलाबी थंडीसह कोवळं ऊन सुख देत आहे. याला कारण म्हणजे थंड वाऱ्याचा प्रभाव सध्या सतत वाढत आहे. यातून तापमानात सतत घट होत असल्याची नोंद होत आहे.

Also Read: गर्दी टाळा, कोविड नियम पाळा अन्यथा कारवाई

यामुळे मॉर्निंग वॉकला (Morning walk) निघालेल्या मुंबईकरांना चांगलीच सुखावू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला पावसाच्या माऱ्यामुळे थंडीचे आगमन झाले होते. दरम्यानच्या काळात किमान तापमानात पुन्हा वाढ झाली. किमान तापमान २४ अंशापर्यंत पोहोचल्याने थंडी पुन्हा गायब झाली की काय असा प्रश्न पडला होता.

मात्र डिसेंबर महिना अखेर जवळ येत असताना वातावरणात गारठा पुन्हा वाढू लागला आहे. तापमानात घट कायम राहिल्यास सोमवारपर्यंत कमाल तापमानही २८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

तर पुढील दोन दिवसांसाठी तापमानाच्या अंदाजनुसार १९ डिसेंबर रोजी कमाल तापमान २९ तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर राहील. तसेच २० डिसेंबर रोजी कमाल तापमान २८ तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here