रांची
झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरातून 290 कोटींहून अधिक रोख रक्कम सापडली आहे. साहूच्या ओडिशा आणि झारखंडमधील ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यात विभागाला कपाटात कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल सापडला. ओडिशा आणि झारखंडमधील त्यांच्या घरातून ही रोकड जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. छापेमारीचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये रोख रक्कम दिसत आहे.
छापेमारीनंतर तब्बल तीन दिवस नोटांची मोजणी सुरू आहे, यावरुन धीरज साहू यांच्याकडे सापडलेली रोख किती जास्त आहे याचा अंदाज येऊ शकतो. नोटा मोजण्यासाठी अनेक मशिन मागवण्यात आल्या आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, छापेमारीदरम्यान २९० कोटींची कॅश सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
आयकर विभागाच्या टीमने बुधवारी ओडिसाच्या बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लि. आणि त्यासंबंधित कंपन्यांवर छापे मारले. या कंपन्यांचा संबंध धीरज साहूशी असल्याचं समोर आलं. याशिवाय बलदेव साहू इंफ्रा प्रायव्हेट लि. कंपनीवर छापेमारी करण्यात आली. ज्याचा थेट संबंध काँग्रेसचे खासदार साहूंशी आहे. विभागाने ओडिसानंतर संबलपूर, बोलांगीर, टिटिलागड, बौध, सुंदरगढ, राउरकेला, भुवनेश्वर आणि झारखंडच्या रांची, बोकारोत छापेमारी केली. काँग्रस खासदार साहू यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
कोण आहेत धीरज प्रसाद साहू?
बीबीसीच्या वृत्तानुसार, धीरज प्रसाद साहू यांचा जन्म १९५५ साली रांचीमध्ये झाला. साहू तीन वेळा खासदार राहिले आहेत. धीरज साहू यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्यापासून साहू कुटुंबीय काँग्रेसशी जोडलेले आहेत. धीरज यांनी तरुण वयापासून युवा काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर साहू यांचं शिक्षण बीएपर्यंत झालं. २०१८ मध्ये जेव्हा त्यांनी राज्यसभेत उमेदवारी दाखल केली तेव्हा प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ३४.८३ कोटी होती.