Twitter : @vivekbhavsar
मुंबई
ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजवणारा आणि महापालिका आयुक्तां सोबत वावरणारा सुमित बाबा कोण? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (शरद पवार) सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. मात्र, त्यांच्या या प्रश्नावर उत्तर देण्याचे मंत्री उदय सामंत यांनी टाळले. एवढेच नव्हे तर हे नाव आपण पहिल्यांदाच ऐकतो आहोत असे सांगून वेळ मारून नेली.
ठाण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पातील घोळ, अनावश्यक वृक्षांची झालेली तोड यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सदस्य सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भाग घेताना जितेंद्र आव्हाड यांनी सुमित बाबा याच्या करामती सभागृहाला ऐकवल्या. ते म्हणाले, हा बाबा सांगतो की ही तुमच्या भाग्यात हा टर्न धोक्याचा आहे, की तो टर्न बंद केला जातो, सुमित बाबा सांगतो की हा टर्न मारा की आयुक्त तिथे दुभाजक काढून टाकतात. या सुमित बाबाच्या सूचना ऐकून महापालिका आयुक्त यांनी अनेक मार्गावर दुभाजक टाकून रस्ते वाहतूक बंद केली. या बाबाची आरती कोण करते असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.
आव्हाड पुढे असेही म्हणाले की, राज्यात कुठेही बाजारपेठेत रस्त्यात दुभाजक टाकला जात नाही. पण या सुमित बाबाच्या सांगण्यावरून ठाण्यातील भाजी बाजारात दुभाजक टाकण्यात आले. त्यामुळे नागरिकांची अडचण होत आहे, त्याचवेळी या बाजारपेठेत असलेल्या दुकांदारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. एका ठिकाणी तर साडे तीन किलोमीटर लांबीचा दुभाजक टाकण्यात आल्याने वाहन चलकांना थेट इतक्या लांब जाऊन वळसा घ्यावा लागत आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. मात्र, अखेरपर्यंत सुमित बाबाबद्दल मंत्र्यांनी खुलासा केला नाही.