कँटीनने भागवली आठशे लोकांची क्षुधा
मुंबई: मुंबईत तुफान पाऊस झाल्याने तिन्ही मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. याचा फटका मंत्रालय अधिकारी आणि कर्मचारी यांनाही बसला आहे.
मंत्रालयात सुमारे एक हजार अधिकारी-कर्मचारी यांनी रेल्वे स्थानक गाठून मध्येच कुठेतरी फसण्यापेक्षा मंत्रालयात मुक्काम करणे पसंत केले आहे.
या सर्व कर्मचार्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी मंत्रालय कॅन्टीन चे व्यवस्थापन धावून आले. मंत्रालय नुतनीकरण करतांना प्रत्येक विभागात जे स्पीकर लावण्यात आले आहेत, तेही आज मदतीस आले.
सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास या स्पिकरवरून उद्घोषणा करण्यात आली आणि सांगण्यात आले की जे अधिकारी, कर्मचारी मंत्रालयात मुक्कामाला थांबणार आहेत, त्यांच्या जेवण्याची सोय करण्यात आली आहे.
या भोजन सुविधेचा लाभ जवळपास आठशे लोकांनी घेतला. सायंकाळी।7 वाजता सुरू झालेला हा अन्न यज्ञ रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होता. शेवटचा कर्मचारी जेवण करून जात नाही आणि कॅन्टीन मध्ये जेवण शिल्लक आहे तोपर्यंत जेवण सुरू राहील, अशी माहिती कॅन्टीन चे सहायक व्यवस्थापक चंद्रकांत मेगाळे यांनी सांगितले.
कँटीनच्या सहायक व्यवस्थापक मेघनाथ सुळे, आचारी तुकाराम चवरे, विजय शिंदे, परशुराम सिताप, भारत वाजे, माडास्वामी सोकापन, यशवंत माळी, बाळाराम गिजे, संजय कळमकर,।दीनानाथ पारधी, प्रवीण वडे, जयसिंग सोळंकी, शिवाजी आव्हाड, रामचंद्र सावंत, किरण सांगळे यांनी परिश्रम घेतले. कँटीनच्या या कर्मचारी वृन्दाला उपसचिव कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.