बीए४ आणि बीए५ व्हेरीयंटच्या रुग्णांची संख्या वाढती
@maharashtracity
मुंबई: राज्यात मंगळवारी बी ए.५ व्हेरीयंटचे (BA-5 variant of Corona) आणखी २ कोरोना रुग्ण ठाण्यात आढळले असल्याची माहिती राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे (NIV, Pune) यांच्या ताज्या अहवालातून देण्यात आली आहे. या रुग्णांपैकी एक रुग्ण २५ वर्षांची महिला तर दुसरा रुग्ण ३२ वर्षांचा पुरुष आहे. हे रुग्ण २८ आणि ३० मे २२ रोजी कोविड बाधित आढळले. हे दोन्ही रुग्ण घरगुती विलगीकरणात (home quarantine) बरे झाले. या दोन्ही रुग्णांचे लसीकरण झाले असल्याचे सांगण्यात आले.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जनुकीय क्रमनिर्धारणात (genome sequencing) सध्या राज्यात सर्वाधिक रुग्ण बीए.२ या विषाणू उपप्रकाराचे आढळत असून त्या खालोखाल बी ए.२.३८ चे रुग्ण आढळत आहेत. मात्र, या व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येने राज्यातील चिंता वाढवली आहे.
दरम्यान, मंगळवारी राज्यात २९५६ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद करण्यात आली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,१५,४१८ झाली आहे. आज २,१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,४९,२७६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९०% एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण १८,२६७ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यात मंगळवारी चार कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१३,८३,११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,१५,४१८ (०९.७३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत १७२४ बाधित
मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात १,७२४ एवढे कोरोना रूग्ण आढळले. आतापर्यंत मुंबईत (Mumbai) एकूण १०,८२,६६७ रुग्ण आढळले. तसेच २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५७५ एवढी झाली आहे.