आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश

Twitter : @maharashtracity

मुंबई : अंबरनाथ व उल्हासनगरमधील वाढती पाणी टंचाई बघता दोन्ही शहरांना वाढीव पाणी कोटा उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच अंबरनाथ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यात यावे, याकरिता आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान लक्षवेधी व तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून आवाज उठविला होता. याला उत्तर देताना याबाबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन उद्योग मंत्री ना उदय सामंत यांनी दिले होते. याच अनुषंगाने त्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान अंबरनाथ व उल्हासनगर शहरांना वाढीव पाणी पुरवठा मिळवून देण्याकरिता सकारात्मकता दाखवत जलसंपदा मंत्री यांच्याकडून संपूर्ण एम. एम. आर. क्षेत्राला वाढीव पाणी कोटा मिळवून देण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी आश्र्वासित केले.

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरू असून त्याकरिता येत्या काही दिवसांत धरण खाली करावे लागणार आहे. यामुळे नवरे नगर येथे ६ एम. एल. डी. व फॉरेस्ट नाका येथून १० एम.एल.डी. वाढीव पाणी कोटा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार डॉ.किणीकर यांनी या बैठकीदरम्यान केली. याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री सामंत यांनी एम.आय.डी.सी.च्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच अंबरनाथ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता कर्जत जवळील कळंबमधील पोशिर येथे धरण बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून त्याबाबत ही तातडीने कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना ना. सामंत यांनी यावेळी दिल्या.

अंबरनाथ पश्चिम भागातील जावसई परिसरात जिल्हा परिषदेचा पाझर तलाव असून या तलावाची योग्य डागडुजी करून त्याठिकाणी जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आल्यास या परिसरातील नागरीकांच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकेल, असे मत आमदार डॉ.किणीकर यांनी या बैठकीदरम्यान मांडले.  याला ही सकारात्मक दाखवत याबाबत ही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन  प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच उल्हासनगर शहराला वाढीव पाणी कोटा देण्याबाबतही चर्चा पार पडली.

अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील सी. ई. टी.पी. प्लांट बाबतही या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. येत्या आठवड्याभरात प्लांट सुरू करण्याच्या सूचना देत वालधुनी नदीचे रासायनिक सांडपाण्यामुळे होणारे प्रदुषणावर आळा घालण्याकरिता ठोस उपाययोजना करण्याचे एम.आय. डी. सी. व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आदेशित केले.

अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील ट्रक टेम्पो माल वाहतूक संघटनेने सोमवारी आमदार डॉ.किणीकर यांची भेट घेत अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात ट्रक टर्मिनल सुरू करण्याची मागणी केली होती, त्यानुषंगाने या बैठकीदरम्यान याप्रकरणी चर्चा करत महावितरणाच्या उच्च दाब वहिनीच्या खाली मोकळ्या जागेत ट्रक टर्मिनल सुरू करण्याकरीता कार्यवाही करण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्याने अंबरनाथ ट्रक टेम्पो माल वाहतूक संघटनेचा प्रश्न ही निकाली निघाला आहे.

या बैठकीला उल्हासनगर विधानसभेचे आमदार कुमार आयलानी, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख रमेश चव्हाण, महिला शहर संघटक मनिषा भानुशाली, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, उपशहर प्रमुख संदीप डोंगरे, माजी नगरसेवक अरुण आशान, सुभाष साळुंके, सुरेश जाधव, राजेश वधारिया, शेरी लुंड, जमनु पुरस्वानी, माजी नगरसेविका समिधा कोरडे, महिला आघाडीच्या शीतल चीखलकर, युवासेनेचे धीरज ठाकूर, शक्ती सोनकांबळे, उद्योग सेनेचे सुनिल खरे,आमाचे अध्यक्ष उमेश तायडे, तसेच म.जी.प्राधिकरण, एम.आय. डी.सी. व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here