महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकावले सुवर्ण
मंजिरी भावसारला मॉडेल फिजीकमध्ये कांस्य पदक
@maharashtracity
माफुशी (मालदीव): भारताने 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत (Asian Bodybuilding Championship) आपल्या पदकांचा धडाका कायम राखला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत 55 किलो वजनी गटात डॉली सैनीने सोनेरी यश संपादले. तसेच ज्यूनियर महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात सोलिमला जाजो हिने रौप्य पदकाला गवसणी घातली तर याच प्रकारात भाविका प्रधानने कांस्य मिळविले.
महाराष्ट्राच्या (Maharashtra) इन्स्पेक्टरपाठोपाठ डॉक्टर मंजिरी भावसारनेही पदक विजेती कामगिरी केली. तिने मॉडेल फिजीक प्रकारात अत्यंत संघर्षमय लढतीत कांस्यपदक जिंकले. काल 4 सुवर्णांसह 12 पदके जिंकणाऱ्या भारताने दुसऱ्या दिवशी एका सुवर्णासह चार पदके जिंकली.
आज आशियाई स्पर्धेच्या महिला गटाच्या सर्व लढती निसर्गरम्य क्रॉसरोड बेटावर झाल्या. आज महिलांच्या गटावर पूर्णपणे वर्चस्व होते ते थायलंड, मंगोलिया आणि व्हिएतनामच्या महिला खेळाडूंचे. या तिन्ही देशांचे खेळाडू प्रत्येक गटाच्या टॉप फाइव्हमध्ये असायचेच. त्यामुळे या तगड्या खेळाडूंपुढे भारतीय खेळाडूंचा निभाव लागणे शक्य नव्हते. तरीही भारताच्या महिलांनी जोरदार प्रयत्न केले. या बलाढ्य देशांपुढे भारताचे नाव उंचावले ते डॉली सैनीने. तिने थायलंड आणि व्हिएतनामच्या खेळाडूंना मागे टाकत भारताला दिवसातील एकमेव सुवर्ण पटकावून दिले.
ज्यूनियर महिलांच्या मॉडेल फिजीक प्रकारात भारतीयांची कामगिरी जोरात होती. या गटात टॉप फाइव्हमध्ये भारताच्या तीन खेळाडू होत्या, तरीही गटाचे विजेतेपद पटकावले ते मंगोलियाच्या मुंगुनशगाई हिने. भारताच्या सोलिमला जाजोला रौप्य तर भाविका प्रधानला कांस्य मिळाले. चौथा क्रमांकही भारताच्याच सोलन जाजोने मिळविला.
भारताला चौथे पदक मिळाले ते सीनियर महिलांच्या 155 सेमी उंचीच्या मॉडेल फिजीक प्रकारात. या गटातही मंगोलियाची बदामखंड पहिली आणि थायलंडची किरीटिया चंतारत दुसरी आली. डॉ. मंजिरी भावसारने या गटात कांस्य जिंकून आपल्या पदकांची यादी आणखी वाढविली. या गटात मुंबईची निशरीन पारीख पाचवी आली. भारताच्या गीता सैनीने मात्र घोर निराशा केली. ती अव्वल पाच खेळाडूंमध्येही स्थान मिळवू शकली नाही.
थायलंडच्या महिलांचा दबदबा
महिलांच्या गटात पुर्णपणे थाय महिलांचा दबदबा होता. त्यांनी महिलांच्या 21 गटांपैकी 5 गटात सुवर्ण आणि दोन रौप्य जिंकत सर्वाधिक 630 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले तर व्हिएतनामने (Vietnam) चार आणि मंगोलियाने (Mangolia)तीन सुवर्ण जिंकत स्पर्धेत सांघिक उपविजेतापदाचा किताब मिळविला. अपामे व्हिएतनाम आणि मंगोलियाने 485 आणि 440 गुण मिळविले.