राज्यातील व्हेरियंट रुग्णसंख्या ४९ वर

मुंबई: राज्यात बीए-५ आणि बीए-४ कोरोना व्हेरीयंटचे (corona variant) आणखी २३ रुग्ण आढळले आहेत. यात ११ पुरुष तर १२ स्त्रिया आहेत. हे सर्व नमुने मुंबईतील असून १ ते १८ जून २०२२ या कालावधीतील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए-४ आणि बीए-५ कोरोना रुग्णांची संख्या ४९ झाली आहे. या पैकी पुण्यात १५, मुंबईत २८, नागपूर येथे ४ तर ठाण्यात २ आढळले आहेत.

दरम्यान, शनिवारी देण्यात आलेल्या माहिती प्रमाणे मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालय मध्यवर्ती प्रयोगशाळेच्या ताज्या अहवालानुसार मुंबई येथे कोरोना बीए-५ व्हेरीयंटचे १७ आणि बीए-४ चे ६ रुग्ण आढळले आहेत. या अहवालाचे पुनरावलोकन एनआयव्ही, पुणे (NIV, Pune) यांचेमार्फत करण्यात आले आहे.

कस्तुरबा प्रयोगशाळेने एकूण ३६४ नमुन्यांचे परीक्षण केले असून त्यापैकी एक नमुना वगळता सर्व नमुन्यांमध्ये ओमिक्राँन (omicron) हाच व्हेरियंट आढळलेला आहे. एकूण ३६४ नमुन्यापैकी ३२५ नमुन्यात कोरोनाच्या बीए-२ आणि बीए-२.३८ हे व्हेरीयंट सर्वाधिक प्रमाणात म्हणजे ८९ टक्के आढळले आहेत. या २३ रुग्णांत ० ते १८ वर्षे वयोगटातील एक, १९ ते २५ वर्षे वयोगटातील दोन, २६ ते ५० वर्षे वयोगटातील नऊ, ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ११ रूग्ण असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात १७२८ नवीन रुग्ण:

राज्यात शनिवारी १७२८ नवीन कोरोना रुग्णांची (corona patients) नोंद झाली. मात्र दैनंदिन संख्या कमी असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. शनिवारी आय सी एम आर पोर्टल मधील तांत्रिक बिघाडामुळे राज्यातील कोविड रुग्णांची संपूर्ण दैनंदिन माहिती मिळण्यास अडचण झाल्याने राज्यात दैनंदिन रुग्ण संख्या कमी दिसते आहे. उर्वरित आकडेवारी पोर्टल सुरळीत सुरु होताच पुढील आकडेवारीत समाविष्ट करण्यात येईल असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७९,५६,१७३ झाली आहे. आज २७०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,८३,९४० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८४% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २४,३३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात शनिवारी ४ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१८,१३,२४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,५६,१७३ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईत ८४० बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८४० एवढे कोरोना रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण ११,०३,६७८ रुग्ण आढळले. तसेच ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९,५९४ एवढी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here