@maharashtra.city

दीड कोटी रुपयांची रोकड,

50 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

धुळे: आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) वेगवेगळ्या पाच पथकांनी जुने धुळे परिसरातील एका खाजगी सावकारासह (private money lender) त्याच्या नातलगांकडे छापेमारी करुन सुमारे दीड कोटी रुपयांची रोकड, 50 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 104 खरेदी खत, 13 सौदा पावत्या, 204 मुदत ठेवी, 38 कोरे धनादेश, 33 कोरे मुद्रांक, आक्षेपार्ह दस्तावेज जप्त केले.

पोलिसांनी (Dhule Police) शहरातील काही महत्वाच्या बँका आणि पतसंस्थांमधूनही महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. विशेष म्हणजे हा सावकार एलआयसी इन्श्यूरन्स कंपनीचा एजंट आहे. या खाजगी सावकाराला अटक करण्यात आली आहे. शिवाय, बुधवारी आणखी तीन ते चार बँक लॉकरची तपासणीही करण्यात येणार आहे.

जयेश उमाकांत दुसाने रा. काझी प्लॉट, धुळे हा युवक दहा वर्ष एलआयसी एजंट (LIC agent) राजेंद्र उर्फे राजू जीवनलाल बंब यांच्याकडे खाजगी नोकरी करीत होता. या काळात जयेशला पैशांची गरज भासल्याने त्याने बंबकडून 2015 मध्ये 30 हजार व 2017 मध्ये चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बंब याने त्याच्या बेकायदेशीर जी. पी. फायनान्स कंपनीच्या नावाने जयेशला हे कर्ज दिले होते.

कर्जापोटी जयेशकडून कोरे धनादेश, घराचे मूळ कागदपत्र, स्वाक्षरी केलेले कोरे मुद्रांक असा दस्तावेज घेतला होता. जयेशने संपूर्ण कर्ज फेडले असतानाही जयेशला घराची मूळ कागदपत्र, कोरे धनादेश देण्यास बंब टाळटाळ करीत होता. तसेच जयेशकडे आणखी पैशांची मागणी करुन त्याला धमकावित होता. याबाबत जयेशने आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार दिली. त्याआधारे राजेंद्र बंबविरुध्द आझाद नगर पोलीस ठाण्यात सावकारी काय्द्यान्वये गुन्हा दाखल झाला.

पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी उपअधीक्षक इश्‍वर कातकाडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत बंडाळे, हर्षवर्धन बहिर यांच्यासह उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची पाच पथकं स्थापन करुन मंगळवारी सकाळी अकराला बंब याच्यासह त्याच्या नातेवाईकांच्या घरी एकाच वेळी पाच ठिकाणी छापेमारी केली. याच वेळी शहरातील काही बँका, पतसंस्थांमध्येही पथकांनी झाडाझडती घेतली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती.

दहा तासांच्या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहीती दिली, की राजेंद्र बंब याच्या घरातून एक कोटी 30 लाख रुपयांची रोकड, 46 लाखांचे 998 ग्रॅम सोन्याचे दागिने, 104 खरेदी खत, 13 सौदा पावत्या, 204 मुदत ठेवी, 38 कोरे धनादेश, 33 कोरे मुद्रांक, त्याचा भाऊ संजय बंब याच्या घरातून 12 लाख रुपयांची रोकड, असे मोठे घबाड पोलिसांच्या हाती लागले.

राजेंद्र बंब याच्याकडे कुठलाही सावकारी परवाना नव्हता. तसेच त्याने जी. पी. फायनान्स कंपनीही बेकायदेशीरपणे स्थापन केली होती. असे असताना या कंपनीच्या माध्यमातून बंबने अनेकांना व्याजाने पैशांचे वाटप करुन 24 व 36 टक्के व्याजदराने पैशांची वसूली केली आहे. तसेच तो व्याजाच्या पैशातून बेकायदेशीर भिशीही चालवत होता. बंब व त्याच्या नातेवाईकांच्या अन्य बँक लॉकरची माहीती मिळाली असून त्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहीती अधीक्षक पाटील यांनी दिली.

“राजेंद्र बंबकडून कोणाचा पैशांसाठी छळ होत असल्यास, तसेच ज्या कोणाची घराची, शेतीची मूळ कागदपत्र बंबकडे गहाण असल्यास, कोणाची बंबविरुध्द तक्रार असल्यास संबंधितांनी तातडीने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी. शिवाय, अन्य सावकारांविरुध्द कोणाची तक्रार असल्यास माझ्याकडे किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here