देवपूरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी
@maharashtracity
धुळे: धुळे (Dhule) शहराच्या देवपूर भागातील नवरंग जलकुंभापासून दत्तमंदिरपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असल्याने नागरिकांना तेथून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) दुर्लक्षामुळे ही रस्त्याची दुरावस्था जैसे-थे आहे. यामुळे मंगळवारी शिवसेनेने (Shiv Sena) आक्रमक आंदोलन करुन सार्वजनिक बांधकाम विभागाला बेशरमच्या झाडांची भेट देवून निषेध केला. तसेच तातडीने या रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. डी. पाटील यांना शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भूमिगत गटार योजनेच्या (underground sewage water scheme) नावाने गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण देवपूर भागातील रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे देवपूर परिसरातील नागरिकांचे खूपच हाल होत आहेत. नागरिक अक्षरशः नरक यातना भोगत आहेत.
बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या देवपूर भागात आग्रारोडवर देखील भूमिगत गटार योजनेचे काम केले गेले आहे. गेल्या 2 वर्षापासून नवरंग पाण्याच्या जलकुंभासमोरून जाणारा देवपूर ते दत्त मंदिरपर्यंतचा प्रमुख रस्ता बंद आहे. वाहनधारकांना विरोधातील बाजूच्या रस्त्याने मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे अनेक लहानमोठे अपघात रोज होत आहेत. या रस्त्यावर एखादा मोठा अपघात घडून जिवितहानी होण्याची शक्यता आहे.
वास्तविक काम करून रस्ता पूर्ववत करून देण्याची जबाबदारी भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदाराची असूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याचे काम करून पावसाळ्यापूर्वी नागरिकांना सोयीचे होऊन वाहतुकीला रस्ता मोकळा करावा. बेजबाबदार भूमिगत गटार योजनेचा ठेकेदारावर गुन्हा दाखल करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे, सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, सतिष महाले, जिल्हा समन्वयक धीरज पाटील, संजय वाल्हे, सचिन बडगुजर, पंकज चौधरी, कुंदा मराठे, प्रतिभा सोनवणे, सुयोग मोरे यांनी केली आहे.