पालिकेची लिलावतीला नोटीस

४८ तासात स्पष्टीकरण देण्याचे आदेश

लीलावती रूग्णालय अडचणीत

शिवसेना नेत्यांनी विचारला लीलावती रूग्णालयाला जाब, घेतले फैलावर

@maharashtracity

मुंबई: मानेचे दुखणे असल्याने लीलावती रूग्णालयात (Lilavati Hospital) उपचार घेणाऱ्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे एमआरआय मशीनसह फोटो व्हायरल झाल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी (Shiv Sena leaders) लीलावती रुग्णालयात जाऊन रूग्णालय प्रशासनाला चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारला. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अखेर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून लीलावती रुग्णालयाला नर्सिंग ऍक्टनुसार (Nursing Act) नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत नोटीस बजावली आहे. येत्या ४८ तासात स्पष्टीकरण देण्याचे फर्मावले आहे.

त्यामुळे आता खा. राणा प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून रुग्णांचे नियमबाह्य फोटो काढणे लिलावती रूग्णालय प्रशासनाला चांगलेच भोवले आहे. लीलावती रुग्णालयाच्या स्पष्टीकरणानेही समाधान न झाल्यास पालिकेकडून (BMC) लीलावती रुग्णालयावर कडक कारवाईचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’मध्ये घुसून हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याबाबत राणा दाम्पत्याने दिलेले आव्हान हे त्यांना चांगलेच महागात पडले आहे. शिवसेना व राणा हे प्रकरण आता आणखीनच चिघळत चालले असून त्याला पूर्णविराम केव्हा मिळणार याबाबत कोणताही राजकीय चाणक्य ठामपणे सांगू शकत नाही, अशी विचित्र अवस्था झाली आहे.

खा. राणा यांना मान दुखत असल्याने लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, मान दुखत असताना एमआरआय (MRI) करताना त्यांचे फोटो काढून व्हायरल करण्यात आल्याने व त्यावेळी रूग्णालय कर्मचारी, प्रशासनाने त्यांना मदत केल्याचे निदर्शनास आल्याने शिवसेना आक्रमक झाली.

शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे (Shiv Sena spokesperson Prof Dr Manisha Kayande) व माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), माजी नगरसेवक अनिल कोकीळ (Anil Kokil), राहुल (Rahul Kanal) आदींनी लीलावती रूग्णालयात धडक देऊन प्रशासन, संबंधित डॉक्टर, कर्मचारी, व्यवस्थापन यांना एकत्रित करून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करून त्यांना चांगलाच जाब विचारण्यात आला.

मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने शिवसेना नेते अधिकच आक्रमक झाले. आता पालिकेने लीलावती रुग्णालयाला एक नोटीस पाठवून त्यांच्याकडे ४८ तासात उत्तर देण्याबाबत फर्मावले आहे. लीलावती रूग्णालयाला पालिका आणखीन काय जाब विचारणार की थेट कारवाईचा बडगा उगारणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here