सामाजिक दायित्‍वाच्‍या माध्‍यमातून समृद्ध समाज निर्मितीचा प्रयत्‍न

मुंबई: मुंबई महापालिका उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळा विरंगुळा मिळावा, एक वेगळा आनंद मिळावा आणि सामाजिक दायित्‍वाच्‍या माध्‍यमातून (CSR) समृद्ध समाज निर्मितीचा प्रयत्‍न म्हणून मुंबई महापालिका (BMC) व सामाजिक दायित्व (सीएसआर) यांच्या संयुक्त विद्यमाने कुलाबा येथील कूपरेज बँडस्‍टँड (Cooperage Band stand) उद्यानात मोफत वाचनालय (Library) सोमवारपासून सुरू करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते सोमवारी या उद्यानातील वाचनालय उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी हे उपस्थित होते.

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहरात सर्व जातीधर्माचे लोक राहतात. मुंबईला अथांग समुद्र किनारपट्टी लाभली आहे. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, दादर, माहिम, आक्सा चौपाटी लाभल्या आहेत. अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे पर्यटकांना मनोरंजन, विरंगुळा यासाठी काही चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, हल्लीची तरुण पिढी ही कॉम्प्युटर, मोबाईल यांमध्ये खूपच व्यस्त असल्याचे दिसून येते आहे.

या तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पालिका उद्यान विभाग प्रयत्नशील आहे. मुंबईत अनेक साहित्यिक, लेखक राहतात. त्याचप्रमाणे मुंबईत लाखोंच्या संख्येने वाचक वर्गसुद्धा आहे. प्रत्येक विभागात हजारोंच्या संख्येने याप्रमाणे २४ विभागात सर्व जातीधर्माचा बऱ्यापैकी वाचक वर्ग आहे. या वाचक वर्गाला वाचन संस्कृती जोपासण्यासाठी पालिका सीएसआर यांच्या माध्यमातून पालिका उद्यानात ‘मोफत वाचनालय’ सुरू करीत आहे.

२ महिन्यात २४ वार्डातील उद्यानात लवकरच मोफत वाचनालये

मुंबई महापालिकेच्या २४ वार्डातील ठराविक उद्यानात जेथे पावसाळ्यातही बसायला शेड, गजीबो असतील अशा ठिकाणी आगामी २ महिन्यात मुंबई महापालिका व सीएसआर यांच्या संयुक्त माध्यमाने वाचक, लेखक यांच्यासाठी कुलाबा, बँडस्‍टँड उद्यानाप्रमाणे ‘मोफत वाचनालय’ सुरू करण्यात येणार आहेत. त्यास चांगला प्रतिसाद लाभेल, असा आत्मविश्वास पालिका उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिकेच्‍या उद्यान विभागामार्फत विविध उद्यानांमध्‍ये सामाजिक दायित्‍वाच्‍या माध्‍यमातून विविध उपक्रम राबविले जातात. ‘Morning Raga’, ‘NCPA@ThePark’ यांसारखे विविध सांगितिक कार्यक्रम आणि इतर सुखद उपक्रम राबवून मुंबईकरांचे धावपळीचे जीवन आल्‍हाददायी करण्‍याचा प्रयत्‍न उद्यान विभागाकडून नेहमीच होत राहिलेला आहे, असे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी केला आहे.

तरुण पिढीत वाचनामध्‍ये रस निर्माण करून एक समृद्ध समाज निर्मितीचा आमचा प्रयत्‍न आहे. या वाचनालयांमध्‍ये सध्या अंदाजे ३० हजार रुपयांपर्यंत निधी कपाट व पुस्तके यासाठी खर्च करून मराठी व इंग्रजी भाषेतील अंदाजे १५० – २०० पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत.

निसर्गविषयक, विविध महापुरूषांच्‍या जीवन चरित्रविषयक, इतिहासविषयक, वृक्ष-फुले-फळांविषयक, आरोग्‍यविषयक, चांगल्‍या जीवन शैलीविषयक त्‍याचप्रमाणे लहानग्‍यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्‍हावा, या हेतूने विविध बोधपर गोष्‍टी तसेच खेळ आणि व्‍यायामाविषयी आवड निर्माण व्‍हावी म्‍हणून त्‍या संदर्भातील पुस्‍तकेही या वाचनालयांमध्‍ये वाचनास उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहेत.

ज्या व्यक्तीला या उद्यानातील पुस्तक वाचायचे असेल त्याने उद्यानाच्या वेळेत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या एका रजिस्टरमध्ये आपल्या नावाची नोंद करून तेथील पुस्तक वाचायला घ्यावे. पुस्तक वाचून झाल्यावर ते जसेच्या तसे त्याच ठिकाणी ठेवण्यात यावे. या उद्यानातील माळी व गार्ड हे मोफत वाचनालय व्यवस्थापनावर लक्ष ठेवतील, असे उद्यान अधिक्षक परदेशी यांनी सांगितले.

नागरिकांनी उद्यान वाचनालयासाठी चांगली पुस्तके दान करावी

मुंबईत आगामी काळात २४ विभागात ज्या ठिकाणी उन्हाळा, पावसाळा यापासून संरक्षण होईल अशी पद्धतीने शेड, गजीबो, बसण्याची सुविधा असेल अशा उद्यानातच पालिका व सीएसआर यांच्या संयुक्त विद्यमाने दानशूर व्यक्तींकडून चांगली पुस्तके दान स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहेत. ज्यांची इच्छा असेल त्यांनी पालिका उद्यानात माळी, केअरटेकर यांच्याकडे आपल्याकडील चांगली पुस्तके दान स्वरूपात द्यावी, असे आवाहन उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here