5 कोटी रोख आणि 5 कोटींचे दुकान द्या अन्यथा पुन्हा बदनामी करण्याची धमकी
मुंडेंनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये केली खंडणी मागितल्याची तक्रार
इंदोर व मुंबई पोलिसांनी रेणू शर्माला घेतले ताब्यात
मुंबई: ‘मागील वर्षी मजाकमध्ये एक कागद पोलिसात दिला तर तुमचे मंत्रीपद धोक्यात आले होते. आता माझ्यावर बलात्कार झाला असल्याची तक्रार करून सोशल मीडियावरून बदनामी करून तुमचे मंत्रीपद घालवेन. असे होऊ द्यायचे नसेल तर मला 5 कोटी कॅश आणि 5 कोटींचे दुकान घेऊन द्या;’ अशा शब्दात कथित रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने पुन्हा एकदा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.
धनंजय मुंडे यांनी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये (Mumbai Crime Branch) धाव घेत रेणू शर्मा नावाच्या महिलेविरुद्ध खंडणी (extortion) मागितल्याची तसेच ब्लॅकमेलिंग करत असल्याची पुराव्यांसह तक्रार दिली आहे.
तथाकथित रेणू शर्मा या महिलेने मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याचा आरोप करत खळबळ माजवली होती. त्यानंतर काही दिवसातच तिने तक्रार मागे घेतली होती. तेव्हापासून रेणू शर्मा ही परदेशातील नंबर वापरून मेसेज, व्हाट्सएप तसेच फोन करून मोठ्या रकमेची मागणी करत होती. यासंदर्भातील सर्व पुरावे धनंजय मुंडे यांनी पोलिसात दिले असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
‘पिछले साल एक कागज सोशल मीडिया पर डाला तो तुम्हारा मंत्री पद जानेकीं नौबत आ गई थी। अब अगर मेरी मांग पूरी नहीं की तो बदनाम कर दुँगी। अगर मंत्री पद बचाना चाहते हो, तो दस करोड कौनसी बडी बात है?’ अशा आशयाचे मेसेज सदर महिला पाठवत असून, याद्वारे 5 कोटी रुपये कॅश व 5 कोटी रुपयांचे दुकान विकत घेऊन देण्याची मागणी रेणू शर्माने केली असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सदर रेणू शर्मा ही महिला मूळ इंदौर, मध्य प्रदेशातील असून ती करुणा शर्माची बहीण आहे. मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंबई क्राईम ब्रँच व इंदौर पोलिसांनी (Indore Police) संयुक्त कारवाई करत तिला अटक करून आधी (दि. 20) इंदौर कोर्टात हजर केले होते. इंदोर कोर्टाने तिला रिमांड दिला आणि त्यानंतर आज (दि. 21) रोजी या महिलेला पुढील चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.