@vivekbhavsar
राज ठाकरे यांनी त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्षाला (BJP) चालवायला दिली आहे, असा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील नेते करत आहेत. यात 100 टक्के तथ्य नसले तरी राज ठाकरे (Raj Thackeray) हे भाजपचीच भाषा बोलत आहेत, हे 100 टक्के सत्य आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) या दोघांना एकाच वेळी अंगावर घेण्यासाठी राज यांना भाजपने संपूर्ण रसद पुरवली आहे. येत्या सहा महिन्यात राज हेच बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Supremo Balasaheb Thackeray) यांचे खरे राजकीय वंशज आहेत आणि बाळासाहेब यांच्यानंतर राज हेच हिंदूंचे रक्षणकर्ते आहेत, अशी प्रतिमा निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये.
म्हणूनच म्हटले की राज यांच्या राजकीय भूमिकेकडे आणि त्यांच्या रणनितीकडे (Political Strategy) पुढील काही महिने लक्ष देण्याची गरज आहे. मशिदीवरील भोंगे (Loudspeaker on Masjid) काढा अन्यथा मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचले जाईल, हा इशारा देऊन राज यांनी निष्क्रिय किंवा काठावर असलेल्या हिंदू मतांना (Hindu Voters) मनसेकडून (MNS) खेचण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. धार्मिक आणि भावनिक मुद्द्याला राज यांनी हात घातल्याने हिंदू मतांचे ध्रुवीकरण सुरू झाले आहे.
भाजप (Bhartiya Janata Party) आणि राज यांनी टाकलेल्या जाळ्यात महाविकास आघाडी (MVA) अलगद अडकली आहे. मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर हे सरकार हिंदूविरोधी आहे, असा प्रचार करणे भाजप आणि मनसेला सोपे जाईल. कायदा हातात घेण्याच्या नावाखाली मनसे कार्यकर्ते यांच्यावर अटकेची कारवाई केली तर मनसे आणि राज आणखी मोठे होतील. काहीही केले तरी राज यांचे राजकीय वजन येत्या काळात वाढणार आहे.
मनसेच्या जाळ्यात अडकली मविआ
माझ्या माहितीप्रमाणे औरंगाबाद (Aurangabad) आणि पुण्यातील (Pune) सभेनंतर सरकार मनसे कार्यकर्ते यांची धरपकड करतील. राज यांची मनोमन इच्छा आहे की सरकारने त्यांनाही अटक करावी. परिस्थिती अशी निर्माण केली जाईल की सरकारला राज ठाकरे यांना अटक करावी लागेल. तसे झाल्यास राज हिरो ठरतील आणि सरकार अजून अडचणीत येईल.
औरंगाबाद येथील सभेत शहराचे संभाजीनगर (Sambhajinagar) असे नामांतर करण्याची भूमिका राज आक्रमकपणे मांडणार असल्याचे समजते. ज्या औरंगजेबाने (Aurangzeb) छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) यांच्या देहाचे असंख्य तुकडे करून त्यांचा वध केला, अशा ‘मुस्लिम’ शासकाच्या नावाने असलेल्या शहराचे संभाजीनगर नामांतर करावे, अशी मागणी राज यांच्याकडून केली जाणार असल्याचे समजते. यातून पुन्हा हिंदू मतांचे ध्रुवीकरण करून मुस्लिम (Muslim) समाजाविरुद्ध वातावरण निर्माण केले जाण्याची शक्यता आहे.
यातून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. तशात मनसे कार्यकर्ते आणि राज यांना अटक झाल्यास मनसेचे आंदोलन अधिक वेगाने राज्यभर पसरु शकेल.
काँग्रेससोबत (Congress) सत्तेत बसणारे उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांचे राजकीय वारसदार नसून राज हेच पर्याय असतील, हे राज्यातील हिंदू मतदारांवर बिंबवण्यासाठी मनसे टोकाची भूमिका गाठू शकेल.
भाजपची भूमिका काय?
मनसे (Maharashtra Navnirman Sena) अर्थात राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच ही खेळी खेळत असल्याचा दावा महाविकास आघाडी सरकारकडून केला जात आहे. येत्या 24 तारखेला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबईत येत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदी आणि राज एकत्र येणार आहेत. त्यानंतर 5 जून रोजी राज ठाकरे अयोध्येला (Ayodhya) जाणार आहेत. त्यावेळी उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे राज यांच्यासोबत अयोध्येला रामलल्ला यांच्या दर्शनाला जातील, असे सांगितले जाते.
हनुमान चालिसा सहसा मराठी समाजात म्हटले जात नाही. मात्र उत्तर भारतीय समाजात (Uttar Bharatiya Samaj) हनुमान चालिसाला अनन्य साधारण महत्व आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Polls) शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर भाजप आणि मनसेला याच उत्तर भारतीय मतांवर विसंबून राहावे लागणार आहे. मनसेला भाजपचा थेट पाठिंबा नसेल तर मनसेला मुंबईत उत्तर भारतीय मतदान करणार नाहीत. म्हणूनच भाजप आणि मनसे अशी थेट युती होऊ शकेल. याच रणनीतीचा भाग म्हणून आधी राज यांना हिंदूंचे समर्थ नेते आणि बाळासाहेब यांचे राजकीय वारसदार म्हणून प्रोजेक्ट करायचे, योगी हे राज यांच्यासोबत आहेत हे बिंबवायचे, म्हणजे पुढचा खेळ यशस्वी होईल, असा भाजपचा कयास आहे.
मंगेशकर पुरस्कार निमित्त राज आणि मोदी यांचे एकत्र येणे आणि योगी यांना राज यांच्यासोबत अयोध्येला पाठवणे यातून दोघा पक्षातील संभाव्य युतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुक प्रचाराची शेवटची सभा शिवाजी पार्क येथे होईल आणि या सभेला राज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील, अशी एक दाट शक्यता आहे.
उद्धव असतील मोठे टार्गेट
महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे हे राज यांच्या रडारवर असतील. निवडणूक प्रचारादरम्यान भाजप सोबतच मनसेदेखील उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई मनपात केलेला गैरव्यवहार (scams) उघडकीस आणतील. पण त्याहीपेक्षा जास्त भयंकर ठरू शकेल अशी बाब म्हणजे उद्धव आणि बाळासाहेब यांच्यातील तथाकथित वाद किंवा अन्य गोपनीय बाबी जाहीर सभेत उघडकीस आणून राज हे उद्धव यांच्या प्रतिमेवर जोरदार घाव घालतील, अशी शक्यता आहे. अर्थात ही गोपनीय बाब काय असेल आणि राज ठाकरे काय बोलणार आहेत, हे राज यांच्या निकट वर्तुळातील व्यक्तीही सांगू शकली नाही. उद्धव हे बाळासाहेब यांना त्यांच्या अखेरच्या दिवसात वडा पाव देत असत, असा आरोप राज यांनी या आधीच्या निवडणूकीत केला होता.
पवार हे दुसरे टार्गेट
राज यांच्या जीवनशैलीवर आणि सवयींवर टीका करणारे शरद पवार हे राज यांच्या टार्गेटवर असलेलं दुसरे नेते. पवार हे नास्तिक असल्याचा दावा पूर्वी करत असत. राज यांनी टाकलेल्या जाळ्यात पवार आणि त्यांची राष्ट्रवादी (NCP) पुरती फसली आणि राष्ट्रवादीकडून पवार आणि त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) या विविध मंदिरात पूजा आणि आरती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ प्रसारित करण्यात येऊ लागले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील (Lok Sabha) एका भाषणात त्यांचे वडील शरद पवार हे नास्तिक असल्याचा उल्लेख केला होता. त्यांच्या याच भाषणाचा उल्लेख असलेला व्हिडीओ आणि सोबत पवार यांचा मंदिरातील फोटो असे एकत्रित सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करून पवार यांच्या प्रतिमेला तडा देण्याची रणनिती मनसे आणि राज ठाकरे यांनी आखली असल्याचे समजते. अशा प्रकारे किमान 25 व्हिडीओ, कार्टून आणि अन्य साहित्य आतापासून तयार असल्याचे समजते. ‘लाव रे तो व्हिडीओ’- भाग 2 हा अधिक आक्रमक असेल, असा दावा मनसेकडून केला जात आहे.
राज यांना काय मिळेल?
निवडणूकीत कुठल्या तरी एका पक्षाला अनुकूल भूमिका घेण्यासाठी राज ठाकरे यांना काय मिळते याबाबत अनेक प्रवाद आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून बोलायचे झाल्यास भाजपने मनसेला मुंबई (Mumbai), नाशिक (Nashik) आणि पुणे (Pune) महापालिकेत काही जागा निवडून आणून देण्यास ‘मदत’ करण्याची ग्वाही दिली आहे असे समजते.
मुंबईत मनसेच्या 25 जागा निवडून आणू, पुढील लोकसभा निवडणुक जेव्हा कधी होतील, तेव्हा मनसेचे पाच खासदार निवडून आणू आणि एक राज्यसभा (Rajya Sabha) जागा देऊ अशीही ग्वाही दिल्याचे समजते. मुंबईत भाजपच्या एका विद्यमान खासदाराची जागा आणि सेनेच्या एका वरिष्ठ विद्यमान खासदाराचा मतदार संघ मनसेला सोडला जाईल अशी शक्यता आहे. नाशिक आणि कल्याण डोंबिवली (Kalyan- Dombivli) लोकसभा मतदार संघ आणि आणखी एक जागा मनसेला सोडली जाईल, अशी शक्यता आहे. घोडमैदान जवळ आहे, त्यामुळे यातील काय काय शक्यता सत्यात उतरतात, हे बघूया.
विवेक भावसार
संपादक
महाराष्ट्र सिटी
मोबाईल: 9930403073