@maharashtracity

मुंबई: वरळी, बीडीडी चाळीतील (BDD Chawl) एका घरात गॅस गळती लागलेल्या गॅस सिलिंडरचा (gas cylinder blast) सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या घटनेत घर मालक बाहेर गेल्याने ते वाचले. पण घराची चावी ज्या शेजारील व्यक्तीकडे ठेवली होती, त्या दोन महिला या दुर्घटनेत जखमी झाल्या आहेत.

जखमीपैकी एक सुनीता वंजारी (४७) या ७० टक्के ते ८० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेतील दुसरी जखमी महिला निशा पाटकर (४३) यांच्यावर नजीकच्या नायर रुग्णालयात उपचार करून त्यांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत आणखीन कोणी जखमी झाले नाही अथवा मोठी जीवित हानी झाली नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) व बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष व शिवसेना विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर (Ashish Chemburkar) यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत मिळण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

प्राप्त माहितीनुसार, वरळी, जी. एम. भोसले मार्ग, जांबोरी मैदान येथील तळमजला अधिक तीन मजली बीडीडी चाळीत (चाळ क्रमांक ५५) तिसऱ्या मजल्यावरील माणिक यांच्या बंद घरात सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास एचपी गॅस सिलिंडरमधून तीव्रतेने गॅस गळती सुरू होती. या गॅस गळतीचा उग्र वास येत असल्याने शेजारील लोकांच्या सांगण्यावरून माणिक यांच्या बंद घराची चावी घेऊन शेजारील सुनीता वंजारी (४७) या माणिक यांच्या बंद घराचे कुलूप उघडून घरात गेल्या. त्यावेळी गॅस सिलिंडरमधील गॅसचा आगीशी संपर्क होऊन स्फोट झाला.

या गॅस सिलिंडर स्फोटात सुनीता वंजारी या ७० ते ८० टक्के गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यासोबतच निशा पाटकर (४३) या सुद्धा जखमी झाल्या. या गॅस सिलिंडरच्या घटनेमुळे बीडीडी चाळीतील शेजारील काही घरांचे नुकसान झाले, कपडे जळाले. काही प्रमाणात सामानाचे नुकसान झाले, अशी माहिती माजी नगरसेवक व विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे बीडीडी चाळ व परिसर हादरले. चाळीतील इतर नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here