@maharashtracity
मुंबई: राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज्यातील ऊसतोड कामगारांना (sugarcane labours) दिलेल्या शब्दाचा दुसरा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे रविवारी (दि. 03 एप्रिल) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुखयमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते हे महामंडळ कार्यान्वित करून याच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन पुणे (Pune) येथे करण्यात येणार आहे.
पुणे येथील येरवडा परिसरातील सामाजिक न्याय भवनाच्या आवारात हे कार्यालय साकारले असून, अनेक वर्ष कागद व घोषणांवर राहिलेल्या महामंडळाला धनंजय मुंडे यांनी मूर्त स्वरूप दिले आहे.
ऊसतोड कामगारांना ओळखपत्र दिले जाणार!
याबाबत धनंजय मुंडे म्हणाले की, अगदी लहानपणापासून ऊसतोड कामगारांचा संघर्ष, त्यांची पिढ्यानपिढ्या होत असलेली हेळसांड पाहत असताना, मनाला वेदना होत. समाजकारणात सक्रिय झाल्यापासून या प्रवर्गासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहितरी विधायक करण्याचा माझा मानस राहिलेला आहे. यादृष्टीने आम्ही सत्तेत आल्यापासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे.
आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप येत आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऊसतोड कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक असून, मी निवडून आलो, मंत्री झालो, त्याहीपेक्षा हा मोठा दिवस असल्याची भावनिक प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.