@maharashtracity

मुंबई: भायखळ्याच्या राणी बागेचे (Rani baug, Byculla) आधुनिकीकरण करणे, प्राणी संग्रहालयात परदेशातून दुर्मिळ प्राणी आणणे व इतर विकास कामे करणे यासाठी कंत्राटकाम १८५ कोटींपर्यंत फुगविण्यात आले. त्यामुळे या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार (corruption) झाला आहे, असा आरोप भाजपने (BJP) केला होता. आता या विकास कामांबाबतचे टेंडर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner IS Chahal) यांनी रद्द केले आहे.

या कामात भ्रष्टाचार करण्यात सहभागी कंत्राटदार (contractors), सत्ताधारी व अधिकारी यांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde), पक्षनेते विनोद मिश्रा (Vinod Mishra) यांनी केली आहे.

भाजपतर्फे गुरुवारी राणी बागेतील झालेल्या व सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कामांची प्रभाकर शिंदे, मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी, माजी नगरसेविका राजेश्री शिरवाडकर, सुरेखा लोखंडे, माजी नगरसेवक कमलेश यादव, नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट, राणी बाग प्राणी संग्रहालय संचालक डॉ. संजय त्रिपाठी, अभियंते तिवारी, प्राण्यांचे डॉक्टर देव शिरसाट, सहाय्यक सुरक्षा अधिकारी छगन काळे हे उपस्थित होते.

राणी बागेत प्राण्यांचे पिंजरे, उद्यानाचे आधुनिकीकरण, विकासकामे आदींसाठी पालिका व सत्ताधारी यांनी कंत्राटदार हायवे व स्कायवे यांच्या व स्वतःच्या फायद्यासाठी कमी खर्चाऐवजी १८५ कोटींचे टेंडर काढले होते. ते नंतर १०६ कोटींवर आणण्यात आले होते. त्यामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार होता.

ही गंभीर बाब लक्षात घेता त्यावेळी भाजपने त्या टेंडरला कडाडून विरोध केला. मात्र सत्ताधारी पक्षाने त्या विरोधाला न जुमानता मंजुरी दिली. त्यानंतरही भाजपने पालिकेत त्याविरोधात आवाज उठवून सदर कामातील भ्रष्टाचाराबाबत आरोप करून चौकशी व कारवाईची मागणी केली होती. परंतु पालिका प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केले होते, अशी माहिती भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

त्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही राणी बागेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे आता पालिका आयुक्त चहल यांनी अखेर राणी बागेचे ते कोट्यवधी रुपयांचे कंत्राट रद्द केले. यासंदर्भातील लेखी पत्र पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांना पाठवले असून सदर कामात अनियमितता होणार असल्याने टेंडर रद्द केल्याचे स्पष्ट म्हटले आहे, असे प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा यांनी सांगितले.

या संपूर्ण टेंडर (Tender) प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे आणि सत्ताधाऱ्यांचे वर्तन संशयास्पद असल्याने त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रभाकर शिंदे व विनोद मिश्रा यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here