प्रज्ज्वला योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी – मंत्री यशोमती ठाकूर
शिवसेनेच्या डॉ. मनीषा कायंदे यांच्या मागणी नंतर चौकशीचे आदेश
@maharashtracity
मुंबई
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून (State Women Commission) राबवल्या जाणाऱ्या प्रज्ज्वला योजनेच्या निधी वाटपात गैरव्यवहार झाला आहे. या गैरव्यवहारांची चौकशी केली जाणार असून त्यासाठी समिती नेमली जाणार असल्याची ग्वाही महिला व बाल कल्याणमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
प्रज्ज्वला योजनेच्या निधी वाटपात गैरव्यवहार झाला. तसेच योजना राबवताना निवडणुकीत त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी वापर करण्यात आला. या प्रकरणी चौकशी करावी तसेच तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात कारवाई करणार का, असा प्रश्न शिवसेना सदस्य मनीषा कायंदे (Shiv Sena MLC Manisha Kayande) यांनी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला.
राज्य महिला आयोगाकडून राज्यातील 288 मतदारसंघापैकी 98 मतदारसंघात प्रज्ज्वला योजना राबवली जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. मंत्री ठाकूर म्हणाल्या की, सन 2019 मध्ये प्रज्ज्वला योजनेत कोणतीही तरतूद नसताना महिला बचत गटांना (Women Self Help Groups) प्रशिक्षण देण्यासाठी निधीचा वापर करण्यात आला. या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. “निधीच्या गैरवापराबाबत चौकशी केली जाईल. तसेच योजनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली जाईल. गरज पडल्यास ही समिती महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांचीही चौकशी करेल, अशी घोषणा ठाकूर यांनी केली.
महिला आयोगाचीविभागीय कार्यालये वर्षभरात
ऍसिड हल्ल्यातील पीडितांना (acid attack victims) नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत का? तसेच महिला आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्याने राज्यातील महिलांना त्यांच्या तक्रारींसाठी मुंबईत यावे लागते. त्यासाठी 2019 च्या अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे पाच विभागीय कार्यालये आणि बाल संरक्षण कार्यालये कधी सुरू करणार आहात, असा प्रश्न मनीषा कायंदे यांनी विचारला. यावर उत्तर देताना ऍसिड हल्ला पीडितांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर राज्यातील पाच विभागीय क्षेत्रात महिला आयोग आणि बाल संरक्षण विभागाची कार्यालये वर्षभराच्या आत सुरू करू, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी सभागृहाला दिली.