सुमारे दोनशे कंत्राटी कामगार दोन महिन्यापासून पगार नाही

@maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे जागेश्वरी येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटरमधील (Trauma Center) कंत्राटी कामगार पगारविना असल्याची तक्रार कामगारांकडून करण्यात येत आहे. कोरोना रुग्ण संख्या घटत असल्यापासून येथील कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष होत असून गेले दोन महिने पगार थकविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

पश्चिम उपनगरातील रुग्णसेवेत महत्वाचे मानले जाणारे बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटरमध्ये कंत्राटी कामगार (contract workers) कार्यरत आहेत. या ठीकाणी केअरवन आणि सिग्मा अशा दोन कंपन्याचे कंत्राट सुरु आहेत. कामगार पुरविण्याचा ठेका घेतलेल्या या दोन्ही कंपनीतील कामगारांना पगार देण्यात येत नाही. यात केअरवन कंपनीतील मल्टी पर्पज लेबर १०५ तर सिग्माचे हाऊसकिपिंग ७५ कामगार असून मिळून सुमारे दोनशे कामगारांना पगार देण्यात येत नाही.

पगाराबाबत कामगारांनी कंपनीकडे विचारणा केली असता पालिका प्रशासनाकडे निधी नसल्याचे सांगण्यात आले. मात्र हे कामगार, कंत्राट घेणाऱ्या कंपनीच्या अखत्यारीत असून पालिका प्रशासनाचा संबंध येत नसल्याचे म्हणणे येथील कामगार मांडतात. यासह कोरोना काळात कोरोना शव उचलण्यासाठी ठरविण्यात आलेला भत्ता देखील देण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.

सन २०२० पासून कोरोना शव उचलण्याचे काम करत असलेल्या कामगारांना वारंवार आश्वासन दिले जात आहे. मात्र भत्ता दिला जात नाही. तसेच यातील सिग्मा कंपनीकडून मल्टीपर्पज कामगारांना २०२१ या वर्षातील दिवाळीचा बोनस देखील देण्यात आला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here