@maharashtracity

लिपीकाला 45 हजारांची लाच घेताना अटक

धुळे: जात प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळण्यासाठी तक्रारदार प्राध्यापकाला तब्बल पाच वर्ष जिल्हा जात पडताळणी कार्यालयात खेटा माराव्या लागल्या. तरीही जात प्रमाणपत्र देण्यासाठी लिपीकाकडून 50 हजारांच्या लाचेची (bribe) मागणी झाली. अखेर पाच वर्ष झालेल्या छळाला कंटाळून प्राध्यापकाने दिलेल्या तक्रारीनंतर धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने मंगळवारी सायंकाळी संबंधित लिपीकाला 45 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.

शहरातील एका शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाने सन 2017 मध्ये जात प्रमाणपत्र घेतले आहे. यानंतर जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळवण्यासाठी त्यांनी संबंधित विभागात अर्ज दिला. अर्जासोबत मूळ जात प्रमाणपत्र देखील दिले होते. परंतु अर्जासोबत जमा केलेले मूळ जात प्रमाणपत्र प्राध्यापकांना मिळाले नव्हते.

यामुळे प्राध्यापकाने मूळ जात प्रमाणपत्रांची दुय्यम प्रत द्यावी, अशी मागणी संबंधित कार्यालयात केली. हि दुय्यम प्रत देण्यासाठी जिल्हा जात पडताळणी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विजय रतन वाघ (वय 51, रा. सुशीलनगर) यांने 50 हजार रुपयांची मागणी केली.

यानंतर संबंधित तक्रारदार प्राध्यापकाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau) तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन बडगुजर यांनी पथकासह सापळा लावून मंगळवारी सायंकाळी पांझरा नदीकिनारी असलेल्या गणपती मंदिराजवळील रस्त्यावर 45 हजार रुपयांची लाच घेताना विजय वाघ याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

2017 पासून तक्रारदार प्राध्यापक जात प्रमाणपत्राच्या दुय्यम प्रतीसाठी चकरा मारत होते. या कारवाईनंतर त्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी प्राध्यापकांच्या तक्रारीवरुन लिपीक विजय वाघ विरुध्द धुळे शहर पोलिसात (Dhule Police) गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here