@maharashtracity

मुंबई: मृत्यू दाखला व त्याच्या प्रती देण्यासाठी पैशांची (bribe) मागणी करुन ती रक्कम स्वीकारणाऱ्या आर/मध्य विभाग कार्यालयातील मृत्यू नोंदणी कारकूनास पालिका प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे.

पालिकेकडून (BMC) प्राप्त महितीनुसार, महापालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयामध्ये मृत्‍यू नोंदणी कारकून म्हणून कार्यरत संतोष तांबे हे बाभई हिंदू स्‍मशानभूमी येथे १७ जानेवारी रोजी रात्री ११ ते सकाळी ७ या रात्रपाळीत कार्यरत होते. त्यावेळी राजेंद्रकुमार कृष्‍णदास कि‍नारीवाला (७२) यांचे पार्थिव अंतिमसंस्‍कार (funeral) करण्यासाठी १८ जानेवारी रोजी सकाळी ६.१५ वाजता बाभई स्‍मशानभूमीत आणण्यात आले होते.

अंतिम संस्‍कार करुन आटोपल्यावर मृत्‍यू दाखला (death certificate) कुठे मिळेल, याबाबत शशांक राव यांनी मृत्‍यू नोंदणी कारकून संतोष तांबे यांच्‍याकडे विचारणा केली. त्‍यावेळी त्यांनी मृत्यू दाखला मी काढून देऊ शकतो. मात्र, त्यासाठी प्रत्‍येक दाखल्‍याच्‍या प्रतीसाठी १०० रुपये लागतील, असे सांगितले. त्यावर शशांक राव यांनी ५ प्रती पाहिजे, असे सांगून संतोष तांबे यांना ५०० रुपये दिले.

वास्तविक, मृत्यू दाखल्याची पहिली प्रत विनामूल्य मिळते आणि त्यानंतर प्रत्येक छायाप्रतीसाठी ६ रुपये आकारले जातात, असे असताना मृत्‍यू नोंदणी कारकून संतोष तांबे यांनी त्यासाठी पैसे घेतले.

त्यानंतर शशांक राव (Shashank Rao) यांनी यासंदर्भात पालिकेकडे रितसर तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेऊन महापालिकेचे उपआयुक्‍त (सार्वजनिक आरोग्य) आणि कार्यकारी आरोग्‍य अधिकारी यांनी दिलेल्‍या दूरध्‍वनी आदेशानुसार आर/मध्य विभागाचे वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी यांनी बाभई स्‍मशानभूमीमध्‍ये जाऊन तक्रारीची चौकशी केली. त्यावेळी सदर तक्रारित तथ्य आढळून आले. त्यामुळे संबंधित कारकून संतोष तांबे यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here