@maharashtracity
मृत महिला पराभूत उमेदवाराची नातेवाईक
धुळे: धुळे जिल्ह्यातील साक्री येथील नगरपंचायतीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाचा गुलाल खाली बसत नाही तोच शिवेसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या नातेवाईकाला मारहाण झाल्याची घटना घडली. यात मध्यस्थी करणाऱ्या महिलेचा मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी नऊ जणांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेची हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणामुळे साक्री शहरात तणावाची परिस्थिती आहे.
नगरपंचायतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कार्यालयासमोर गर्दी होती. तेथून शिवसेनेचे गोटू उर्फ रवींद्र राजेेंद्र जगताप, विषू शिवाजी पवार, देव रोहीदास बाबर व बहिण मोहिनी नितीन जाधव (वय 28) हे जात असताना जगताप व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. वादानंतर गोटू, विषू, देव व मोहिनी यांना जमावातील मनिष गिते, रमेश सरक, उत्पल नांद्रे यांच्यासह पाच ते सहा जणांनी मारहाण केली. या मारहाणीत मोहिनी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर मोहिनी जाधव यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली. यावेळी जमाव जमल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी जमावाची समजूत घालून त्यांना शांत केले.
यानंतर मोहिनी यांचा मृतदेह धुळे येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात पाठवून गुरुवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.
या प्रकरणी माया शिवाजी पवार यांच्या फिर्यादीवरुन मनिष गिते, रमेश सरक, उत्पल नांद्रे यांच्यासह पाच ते सहा जणांविरुध्द भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल झाला.