@maharashtracity
शिवसेनेच्या नेत्यांना आमदार योगेश कदम यांचा घरचा आहेर
दापोली (रत्नागिरी): शिवसेनेचं (Shiv Sena) खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं (NCP) बळ वाढवायचं ही छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती. ती दुर्देवाने दापोलीत यशस्वी झाली, असा थेट घरचा आहेर आमदार योगेश कदम (Shiv Sena MLA Yogesh Kadam) यांनी नाव न घेता दिला आहे.
कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली व मंडणगड नगरपंचायत निकालानंतर आता शिवसेनेतील रामदास कदम (Ramdas Kadam) विरुद्ध पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांवर निशाणा साधलाआहे. दापोली व मंडणगड निवडणूक निकालानंतर मनातली सल बोलून दाखविली आहे.
मंडणगडमध्ये जे शिवसैनिक अपक्ष म्हणून उभे राहिले ते आठ जण निवडून आले आहेत. मंडणगडध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसेल हा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.
आमच्या नेत्यांमुळेच दापोली (Dapoli) शहरात राष्ट्रवादीलाच फायदा झाला. यात शिवसेनेचा कोणताही फायदा झाला नाही. जे शिवसेनेचे सहा उमेदवार निवडून आलेत, त्यातील चार हे एबी फॉर्म भरण्याच्या पाच मिनिटं आधी राष्ट्रवादीतून येऊन शिवसेनेचा पट्टा घालुन सेनेत आले. त्यामुळे यात शिवसेनेचा कोणताही फायदा नाही. राष्ट्रवादिला बळ देण्याचे काम आमच्याच काही नेत्यांनी केले, असा गंभीर आरोप आमदार योगेश कदम यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
नाराजांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांना मिळालेली मते ही जास्त आहेत. हा निर्णय शिवसैनिकांना पटला नव्हता, हेच यातून स्पष्ट झाले. गेली पाच वर्षे सेनेची सत्ता होती. नगराध्यक्ष आमचा होता. पण यावेळी परस्पर केलेल्या आघाडीमुळे सेनेचे नुकसान झाले, असा घरचा आहेर आमदार योगेश कदम यांनी दिला आहे.
अपक्षांना मिळालेल्या मतांवरून, दापोलीतील शिवसैनिक जागेवरच आहे हे सिद्ध झालं आहे. रामदास भाई आणि मी पूर्णपणे या निवडणुकीपासून अलिप्त होतो, प्रचारामध्ये आम्ही कुठेही सहभाग घेतला नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.