@maharashtracity
राज्यात एकूण ४० ओमिक्रॉन रूग्ण
मुंबई: राष्ट्रीय विषाणू विज्ञान (NVI) संस्थेने दिलेल्या अहवालानुसार शुक्रवारी राज्यात आणखी ८ रुग्ण ओमिक्रॉनबाधित (Omicron) आढळले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यापैकी ६ रुग्ण पुणे, १ रुग्ण मुंबई आणि १ रुग्ण कल्याण डोंबिवली येथील आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ४० ओमिक्रॉन रूग्ण आढळले आहेत.
दरम्यान, मुंबई १४, पिंपरी चिंचवड १०, पुणे ग्रामीण ६, पुणे मनपा २, कल्याण डोंबिवली २, उस्मानाबाद २, बुलढाणा १, नागपूर १, लातूर १ आणि वसई विरार १ अशी विभागणी आहे.
यापैकी २५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर (RTPCR test) चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी आढळलेल्या ८ रुग्णांमध्ये सर्व रुग्ण पुरुष आहेत.
२९ वर्षे ते ४५ वर्षे वयोगटातील या रुग्णांपैकी ७ रुग्ण लक्षणेविरहित, १ रुग्ण सौम्य स्वरुपाचे असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार या पैकी पुणे येथील ४ रुग्णांचा दुबई (Dubai) प्रवास आणि २ रुग्ण निकटसहवासित आहेत.
मुंबई येथील १ रुग्णांचा अमेरिका (USA) प्रवास आणि कल्याण डोंबिवली (KDMC) येथील १ रुग्णांचा नाजेरिया (Nigeria) प्रवास आहे. या ८ रुग्णांपैकी २ रुग्ण रुग्णालयात तर ६ जण घरी विलगीकरणात (quarantine) आहेत.
या रुग्णांच्या निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
सर्व रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५२५ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी (genome sequencing) पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७९ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.