@maharashtracity
युनिव्हर्सल पासची बेस्टमध्ये तपासणी होणार
मुंबई: राज्य सरकारच्या या नवीन नियमावलीनुसार मुंबई उपनगरीय लोकलमध्ये (local train) युनिव्हर्सल पासची (Universal Pass) तपासणी होते. त्या धर्तीवर आता बेस्ट (BEST) बसेसमध्येही दोन डोस घेतलेल्या युनिव्हर्सल पासची तपासणी केली जाणार आहे.
याची अंमलबजावणी मंगळवारी ३० नोव्हेंबरपासून होणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
सध्या बेस्ट बसेसने २६ लाख प्रवासी प्रवास करीत असून बेस्ट उपक्रमाच्या २६ बस आगार व्यवस्थापकांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दक्षिण आफ्रिकेत नवा ओमिक्रॉन विषाणू (Omicron variant) आढळल्यानंतर जगभरातील देशांमध्ये घबराट पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संपर्कात येणारे सगळे देश अलर्ट झाले असून मुंबईसह भारतही सावध झाला आहे.
ओमिक्रॉन या घातक विषाणूचा प्रवेश होण्यापूर्वीच त्याला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेसह (BEST) बेस्ट उपक्रम सज्ज झाला आहे. सध्या बेस्ट बसेसने रोज २६ लाख प्रवासी प्रवास करतात. दोन्ही डोस झालेल्या प्रवाशांचा युनिव्हर्सल पास तपासणीसाठी टीसी उपलब्ध करण्यात आले आहेत.
ही संख्या कमी असल्याने त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. तसेच बस सुटते त्या ठिकाणीही युनिव्हर्सल पासची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे युनिव्हर्सल पास तपासण्यात काही अडचण येणार नाही, असा विश्वास लोकेश चंद्रा यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सध्या काही वाहकांना हंगामी पदोन्नती देण्यात आली असून त्यांची या कामात मदत घेण्यात येणार आहे.