@maharashtracity
आफ्रिकन देशांत आढळलेल्या कोरोनाच्या नवीन विषाणूबाबत काळजी घ्यावी
महापालिका आयुक्त डॉ.इकबाल चहल यांचे आदेश
मुंबई: आफ्रिकन देशांत आढळून आलेल्या कोरोनाच्या नवीन विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुंबईला या विषाणूच्या संसर्गापासून वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन व महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांनी सजग राहून सर्वतोपरी दक्षता घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal) यांनी दिले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांच्याशी चर्चा करून नवीन विषाणूबाबत
काही सूचनावजा आदेश दिले आहेत.
यावेळी, टास्क फोर्स चे सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. संजय ओक यांनीदेखील मार्गदर्शन केले.
कोरोनाच्या नवीन विषाणूबाबत पालिका, पोलीस, विमानतळ, रुग्णालये, टास्क फोर्स अधिकारी यांची संयुक्त बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे शनिवारी सायंकाळी पार पडली.
कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या आफ्रिकन देशांमधून थेट किंवा अन्य हवाई मार्गाने आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबईत आल्यास त्यांचे पासपोर्ट काटेकोरपणे तपासावे. संबंधित प्रवाशांमध्ये नवीन कोरोना विषाणूबाबत संसर्गाची लक्षणे दिसल्यास त्याबाबत काटेकोर वैद्यकीय तपासणी करावी, त्याआधारे वैद्यकीय चाचणी देखील करावी.
सध्याच्या पद्धतीनुसार त्यांना अलगीकरणाच्या सूचना द्याव्यात. जर एखादा प्रवासी बाधित आढळला तर त्याला तातडीने संस्थात्मक विलगीकरण (Institutional quarantine) करावे. बाधित नमुन्यांचे जनुकीय गुणसूत्र (Genom sequencing) पडताळावे. तसेच बाधिताच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन पुढील कार्यवाही त्वरेने करावी, असे सक्त आदेश आयुक्त चहल यांनी दिले आहेत.
गाफील राहू नये -:आयुक्त
मुंबईत येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मागील १५ दिवसांच्या प्रवासाची आवश्यक माहिती संकलित करावी. नवीन विषाणू प्रकाराने बाधित असलेल्या आफ्रिकन देशांमधून थेट मुंबईत येणारी विमाने नाहीत, ही तूर्तास दिलासादायक बाब असली तरी गाफील राहून मुळीच चालणार नाही.
येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी स्वयंघोषणा पत्र देऊन मागील १५ दिवसातील आपल्या प्रवासाची माहिती देणे गरजेचे आहे. त्यांचे पासपोर्ट विमानतळ अधिकाऱ्यांनी बारकाईने तपासावेत. प्रचलित पद्धतीनुसार या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी आणि चाचणी तसेच अलगीकरण अत्यंत काटेकोरपणे करावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
कोरोना जंबो सेंटर पुन्हा कार्यान्वित करण्याचे आदेश
महापालिकेतर्फे उभारण्यात आलेली सर्व जम्बो कोरोना सेंटर (Jumbo Corona Centre) योग्य क्षमतेने कार्यान्वित राहतील, यादृष्टीने त्यांची पुन्हा फेरपाहणी करावी. त्यामध्ये वैद्यकीय आणि इतर आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय प्राणवायू निर्मिती व साठा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था या बाबींचा आढावा घ्यावा, असे आदेश आयुक्त चहल यांनी दिले आहेत.
तसेच, बेफिकीरपणे वागणाऱ्या, मास्क नीटपणे न लावणाऱ्या नागरिकांवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने पुन्हा कडक दंडात्मक कारवाई सुरू करावी. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देण्याबाबत भर दिला पाहिजे.
विविध आस्थापना, दुकाने, मॉल, चित्रपट गृह अशा सार्वजनिक ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
सर्व विभागीय कार्यालयांनी वॉर्ड वॉर रूम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी कोणत्या उपाययोजना नव्याने कराव्या लागतील, त्याचा आढावा घ्यावा. झोपडपट्टी व तत्सम भागांमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये दिवसातून किमान पाच वेळा पूर्ण निर्जंतुकीकरण करावे.
सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपायोजना करण्याच्या दृष्टीने पुन्हा तयारीला लागावे. रुग्णवाहिका व इतर वाहने उपलब्ध होतील, यासाठी पूर्व तयारी सुरू करावी, असे आदेशही आयुक्त चहल यांनी दिले आहेत.