@maharashtracity
नुकसान भरपाई द्या – आमदार फारूक शाह यांची मागणी
धुळे: धुळे (Dhule) शहरात बुधवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain) शहरात विविध भागात नुकसान, हानी झाल्याने नागरिकांमध्ये आक्रोश पाहण्यास मिळाला. सुमारे दोन हजार कुंटूबांना अतिवृष्टीचा फटका बसला असल्याने या कुटुंबांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शहराचे आमदार फारुक शाह (MLA Faruk Shah) यांनी राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याकडे केली आहे.
धुळे शहरात झालेल्या अतिवृष्टीने प्रामुख्याने धुळ्यातील बिलाल मस्जिदजवळ १०० फुटी रोड, तिरंगा चौक, आझाद नगर, अग्रवाल नगर, मारिया शाळा, नंदी रोड, चित्तरंजन कॉलनी, गजानन कॉलनी, जनता सोसायटी, हजार खोली, जामचा मळा, मौलवी गंज, समता नगर, भाईजी नगर, काजी प्लॉट, देवपूर मधील विटा भट्टी, आधार नगर, अंदरवाली मस्जिद, नेहरू नगर, लक्ष्मीवाडी मिल परिसर आणि देवपूर तसेच शहरातील विविध भागातील कॉलनीमधील रहिवाशांचे घरात पाणी शिरुन घरातील अन्न धान्य व संसारपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
साधारणतः २००० कुटुंबाना अतिवृष्टीने फटका बसला आहे. यासर्व नुकसानीची आमदार फारूक शाह यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असात ते देखील व्यथित झाले. गरीब रहिवाशांना संकट काळात मदत व्हावी यासाठी त्यांनी मुंबई येथे राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत अतिवृष्टीने व ढग फुटीने नुकसान व हानी झालेल्या कुटुंबाना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
यावर राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार साहेब यांनी धुळे जिल्हाधिकारी यांना तात्काळ पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.